Thursday, July 31, 2008

सखीचा शोध

पहाटेचं धुकं दबा धरून बसलेलं असतं. एखाद्या सांजेला त्या दवबिंदूंनाही डोळे फुटतात. अशा एखाद्या स्नीग्ध संध्याकाळी विस्तीर्ण पटांगणावर पडून आभाळ डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करावा, डोळे हळूच मिटून घ्यावेत. मिटलेल्या डोळ्यात आभाळ साकारू लागतं. त्या आभाळात एक चेहरा उमटतो. तीच सखी असते.
प्रत्येकाच्या डोळ्याच्या किरमिजी पडद्यावर अगदी कळायला लागायच्या आधीपासून सखीचा चेहरा अस्पष्ट, धूसर दिसत असतो. वयाला जाग येते आणि फुलांच्या ताज्या सुगंधात न्हायलेली सखी गुणगुणायला लागते. पण सखीचा चेहरा काही स्पष्ट नसतो. मग दिवसाच्या गर्दीत काही अबोल चेहरे नजरेला स्पर्ष करून जातात. आपण मग स्वतःच्याही नकळत सखीचा चेहरा त्या अनोळखी चेहर्र्याशी जुळवून पाहतो. पण एखादा तरल फरकही आपल्याला त्या चेहर्र्यापासून विलग करतो. चेहर्र्यांचं काय? ते अनेक रूपांत येतात. चेहरा दिसला की डोळे मिटून सखीचा शोध सुरू होतो. एखादा चेहरा मग अगदी... अगदी... पापण्यांच्या चिरेबंदी तटबंदीआड लपवून ठेवलेल्या सखीच्या चेहर्र्यासारखा भासतो. असा चेहराच चोरून नेण्याची आपली गडबड विलोभनिय असते. त्यालाच कदाचीत प्रेम म्हणत असावेत.

बरेचदा गर्दीत आपल्याला भावलेल्या चेहर्र्याच्या मालकिणीची आपण सहज चोरी करतो. हळूहळू त्यावर हक्कही प्रस्थापित करतो... मालकी हक्क! पण मालकी हक्काची विखारी भावना आणि तो गाजवण्याची भूक भागली, की कळतं, की आपली फसगत झालेली आहे. एकदा असं कळायला लागल्यावर माणूस ज्ञानी होत नाही. पण शहाणा मात्र होतो. अशा शाहण्यांना कळतं. चेहरा म्हणजे सखी नव्हे. मालकी हक्क स्थापन करण्याची धडपड म्हणजे प्रेम नव्हे. ती केवळ भुकेजली हाव होती. सखी नावाच्या आत्मशोधाच्या मार्गात अडथळा आणणारी देहाची खाज. पण तोपर्यंत मनावर उपभोगाचे अन आसक्तीचे अनेक ओरखडे पडलेले असतात. टोकदार नखांनी ओरबाडणारेही आपणच. जखमाही आपल्याच. उर्वरीत अख्ख आयुष्य या जखमांवर मलम लावण्यात जातं. जखमा बर्र्या होत आल्या, की त्यांना परत भुकेची खाज सुटते. अश्यावेळी आपण स्वतःचीही नजर चुकवून अपराधीपणे त्या जखमा खाजवून घेतो. त्या अपराधातही सुख शोधतो. खपली निघते आणि वखवख वाढत जाते...

या प्रवासात काहींचा सखीचा शोध थांबतो. जे भुकेलाच सर्वस्व समजतात, त्यांना देहाचे उंबरे अडवतात. पण काहीजण मात्र सखीचा शोध सुरू ठेवतात. पदरी पडलेलं गुलाबाचं रोपटं जगत राहील, याची तजवीज करून सखीचा शोध घेत राहतात. ही प्रतारणा नव्हे. तेजाला नैतीक अनैतीकतेच्या रंगीत चौकडी नसतात. तेजातून अनेक रंग प्रस्फुटीत होतात. तेज मात्र रंगाच्या पलीकडचं असतं. सखीचंही नेमकं असंच असतं. सखीचा शोध अनंतापासून अनंतापर्यंत अव्याहत सुरुच असतो. देहाची बंधनं आणि यमनियम या शोधाला नसतात. आणि हा शोध संपलाच, तर मग आयुष्यात काय उरेल? प्रेम हे मिळवण्यात नाहीच, मिळवण्याच्या विजिगिषेत आहे. शोधच संपला, तर कुठल्याही देहाच्या चौकटीतील आयुष्याला अर्थच उरणार नाही. मग एखाद्या भाग्यवंताला सखी सापडली, तरीही फुलांच्या गर्दीत त्याने परत ती हरवून बसावी व शोध सूरू ठेवावा...

असेही नाही. सखी अंशाअंशाने भेटत राहते. भेटता भेटता हुलकावणी देते. सखी अंशतः जीथे प्रकट झाली (किमान तसा भास झाला) तिथे त्या देहाचं आपण देउळ बांधतो. मग पुजा सुरु होते. पूजा डोळे बंद करून, हात जोडूनच करायची असते. डोळे बंद केले, की बंद डोळ्यांआडच्या अंधारात सखीचा चंद्र उगवतो. आपण समजतो, ते देवळाचं सामर्थ्य आहे. मग ज्याला जीथे सखी दिसेल, तिथे तो देऊळ बांधतो. आपण सीतेचं देऊळ बांधतो. राधेचं, मिरेचं, दमयंतीचं... सगळ्यांची मंदिरं उभारतो. आपल्याला तर अश्या मंदिरांच्या प्रासादिक गाभार्र्यात पहाटेचे दवबिंदूही जपून ठेवायचे असतात. पण सखी काही काळ प्रकट झाली, म्हणजे ते अस्तीत्त्व सखी होत नाही. सखी कधी राधा असते, मिरा असते, कालपुरुषाची वनवासात सोबत करणारी सीता असते. पाच पतींचा सांभाळ करणारी द्रौपदी असते, आणि तीला आपल्या पाच मुलांची अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याची आज्ञा करणारी कुंतीही असते. तरीही सखीचं अस्तीत्त्व त्यांच्याही पलीकडे असतं.

सखीला आईच्या हाताच्या दूध-भाताचा स्नेहमय गंध असतो. प्रेयसिच्या पेटत्या स्पर्षाचा मोगराही सखीच असते. आराधना जेवढी बळकट, प्रार्थनेत जेवढं बळ, आणि समर्पणात जेवढी निरागसता, तेवढी सखी जास्त समीप असते. प्रेयसी-पत्नी म्हणूनच सखीला काहीही चोरून न ठेवता व्यक्त होता येतं. म्हणून कदाचीत सखी प्रेयसी म्हणून अधीक भावते. तसं सखीचं अन आपलं शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधासाठी निर्माण झालेलं कुठलंच नातं नसतं. पण व्यक्ततेची उत्कटता जीथे साध्य होते, ते नातं, त्या त्या परिवेषात आपल्याला जवळचं वाटतं. कुठलंही नातं गरजेवर आधारीत असतं. गरज बदलली की नातंही बदलतं. बदलणार्र्या प्रत्येक गरजेला आपली ओंजळ देण्याची क्षमता आणि ईच्छा फक्त सखीतच असते. सखी मग आई होवून सावली देते, प्रेयसी होवून समर्पण देते, तीच्या समर्पणाची गोंदणं शरीरभर उमटलेली असतात. प्रेयसी झालेली सखी तूमच्यावर पूर्ण अधीकार मिळवते. पण तीच्या अधीकारात आर्जव असतं. तीच्या अधीरतेला संयमाचा लाजरा स्पर्ष असतो. पण तीचं कोसळणं मात्र अनावृत्त, अनाघात असतं. मिलनाचा एक मत्त भावगंध दरवळतो. अस्तीत्त्वाच्या चौकटीला तीथे थारा नसतो. देहभान हरवीणे आणखी कशाला म्हणायचं? देहभान हरवलं, की मग देहाचं नेमकं भान येतं. या नेमकपणाच्या अवस्थेलाच समाधी म्हणतात. सखीच्या उन्मुक्त समर्पणातूनच समाधीवस्था प्राप्त होते.

सखी साधी असते. शृंगाराचा अनैसर्गीक देखावा नसतो. सौभाग्याचा टिळाच तो काय तीच्या भाळी असतो. असा साधेपणाच तीचं सौंदर्य आणि सामर्थ्य असतो. सखी साजशृंगारानं नटली, तर कहर करेल. सखी तरल असते. सख्याच्या बाबतीत ती हळूवार असते. रात्र ओथंबून गेल्यावर आळसावून निजलेल्या सख्याच्या देहाखालून ती हळूच वस्त्र खेचते. शयनगृहाच्या खीडकीचे पडदे ओढून घेते. एखादी चूकलेली चांदणी त्याच्या शेजारी येऊन पहूडली तर? सखी अश्या अनेक रूपात दरवळत असते. रात्र मोगरामोगरा झाली, की गात्र संपन्न समाधानानं थकतात. सख्याकडे नजरेचा रेशमी कटाक्ष टाकून सखी दिवसाच्या स्वागताला लागते. संसाराचा सांभाळ तीलाच करायचा असतो. ती प्रतीपालक असते. अधरातली मस्ती डोळ्यात साठवून ती कार्यमग्न होते. अंगण झाडणारी सखी, सडा-संमार्जन करणारी सखी, तुळशीजवळ हात जोडून उभी असणारी सखी, स्वयंपाकात मग्न असलेली सखी, तुम्हाला वाढतांना तृप्त होणारी सखी...

सखी भूपाळी असते. सखी मालकंस असते. सखी पूर्वा असते, सखी भैरवीही असते. पायात पैजण, हातातल्या बांगड्या, कानातली कर्णफुलं, केसात माळलेला गजरा, सखीच्या देहभर संगीताची मैफील सजलेली असते. सखी म्हणजे मुर्तीमंत संगीत. सखीच्या वावरण्याच्या देहनक्षी देहभर पसरलेल्या असतात. ती एक दैवलीपीच असते. वाचता आली तर वाचतो आपण. सखी म्हणजे नक्षी. सखी म्हणजे रंग. सखी म्हणजे संग. सौंदर्याचा. हे सौंदर्य मग देहऊभारी देतं. वागण्यात डौल येतो. कामाला वेग येतो. आत्मसन्मान डवरतो. सखी हे सारं फुलवते. व्यक्तीमत्त्व खूलवते. सखी म्हणजे आत्म्याचा श्वास. सखी म्हणजे पूर्णत्त्वाचा ध्यास... सखीच्या देहभर खेळतांना तिच्या कुशीत आपण केव्हा वाढू लागतो, तेच कळत नाही. कूस खूशीत आली की सखीला आत्मभान येतं. देहाचं मंदिर होतं. निजलेल्या बाळाला थोपटतांना सखीचे हात अंगाई होतात. बघता बघता सखी सख्याचीही आई होते. सखीचं हे रूप देखील पुर्णत्त्वाचा भासच. सखी पुर्णत्त्वानं अवतरणं हा परत शोधाचा विषय. सखी अशीच अंशाअंशानं भेटत जाते. पैंजणांच्या रूणझुणीतून, पहाटेच्या निशःब्द आलिंगनातून, पक्ष्य़ांच्या उबदार घरट्यातून, पारीजातकाच्या फुलं सांडण्यातून, आईच्या हातातून, प्रेयसीच्या ओठातून, मंदिराच्या धूपानं दरवळणार्या गाभार्र्यातून, नंदादीपाच्या तेवण्यातून... सखीच्या अस्तीत्त्वाचा असा एक एक कण वेचीत जावा. वाटेला वाट फुटत जाते. ओंजळीतल्या क्षणांची फुलं झालेली असतात. या फुलांच्या माळा करून धावत सुटावं. मंदीराच्या असंख्य घंटा घणघणायला लागतात. दिव्यामुखी अंगार फुलतो. फुलांच्या वाती होतात. ज्योत ज्योतीमध्ये मिसळून जाते. आभाळ जमिनिला जीथं टेकतं, तीथल्या उंच कड्यावर उभं राहून जलभार झालेल्या ढगातून पाण्याचं तीर्थ घ्यावं आणि साद द्यावी - सखी.... सखी.... सखी...! सखीची भेट झाली, तरी ओंजळीतल्या फुलांसह सखी उधळून द्यावी उंच कड्यावरून आणि परत फीरावं. शोध मात्र थांबवू नये.