Friday, December 21, 2007

"ऋतूस्पर्श" कार श्याम पेठकरांना भैरोरतन दमाणि पुरस्कार प्रदान!
भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार त्यांच्यासह यशोधरा काटकर यांना "थर्ड पर्सन' या कथासंग्रहाबद्दल आणि भिन्न' कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे होते. उद्योगपती प्रेमरतन दमाणी, नवरतन दमाणी, पुरस्कार समितीचे निमंत्रक रामदास फुटाणे आणि महापौर अरुणा वाकसे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. रु.२५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण गांधीजींच्या विचाराकडे पाठ फिरवली, पण आपल्याला खाते- पिते, समृध्द गाव उभे करायचे असेल तर कचकड्याच्या आयुष्यापासून दूर जाऊन निसर्गाकडे वाटचाल केली पाहिजे, असे मत लेखक श्‍याम पेठकर यांनी व्यक्त केले. झाडांचे हात, वेलींची साथ आणि फुलांची पायवाट सोडून दिल्याने निर्माण झालेली आत्महत्या करायला लावणारी स्थिती बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

विशिष्ट लेखनाचे साचे मोडून टाकणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांची निवड पुरस्कारासाठी केल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द.हातकणंगलेकर यांनी पुरस्कार निवड समितीचे कौतूक केले. दाहक वास्तवाला भिडणाऱ्या लेखकांची नवी पिढी निर्माण होत आहे, त्याचे समाधान होत आहे, असे ते म्हणाले. मराठी साहित्यात या तीन पुस्तकांनी क्रांती घडवली आहे, असे नमूद करून केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या पुस्तकातील वास्तवाच्या आगीचे चटके दाहक असल्याचे सांगितले.

प्रारंभी उद्योगपती नवरतन दमाणी यांनी प्रास्तविक केले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी नेटके सूत्रसंचालन केले. निवड समितीचे सदस्य कवी दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, द.ता.भोसले, शरदकुमार एकबोटे, डॉ. गीता जोशी, राजेंद्र दास यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments: