Sunday, June 24, 2007

बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट

 

(ऋतुस्पर्श या पुस्तकावर सकाळ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजीत यांचे समिक्षण!)

हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरविली आहे.
वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे.

"गेल्या हजार वर्षांच्या मराठी साहित्याच्या पसाऱ्यात शब्दांच्या आणि शब्दामधून मांडण्यात येणाऱ्या भावनांच्या ज्या खेळ्या मांडल्या गेल्या त्यात श्रीमान संत ज्ञानेश्‍वरांच्या खेळ्या अप्रतिम आहेत. शब्दांची रचना, भावनांची रचना; त्यासाठी वापरायच्या चपखल आणि जिव्हारी जाऊन बसणाऱ्या प्रतिमा आणि प्रतीकं याबाबतीत ज्ञानेश्‍वर माउलीला तोड नाही....शब्दांच्या, भावनांच्या, प्रतिमांच्या, प्रतीकांच्या बाबतीत आधुनिक काळात श्‍याम पेठकर माउलीची उंची गाठू पाहतात, असं मला वाटतं.''...."ऋतुस्पर्श'च्या प्रकाशन सोहळ्यातील राजन खान यांचे हे वाक्‍य मला अजूनही विसरता येत नाही. अलीकडच्या काळात एखाद्या साहित्यकृतीची तुलना करताना एवढं दिलदार आणि दिलखुलास होणं भल्याभल्यांना जमलेलं नाही. राजन खान हे नाव अपरिचित नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकानं ही दिलेरी दाखविली तेव्हा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित होते. "मौनराग'मधून स्वतःचे आस्वादक आयुष्य ताकदीने मांडणाऱ्या एलकुंचवारांच्या साक्षीनं त्यांनी श्‍याम पेठकरांना ही पावती दिली. मुख्य म्हणजे, राजन खान यांनी हे भाषण मुद्दाम लिहून आणलं होतं. मी असं बोललोच नाही, अशी म्हणण्याची वेळ येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली होती.

"श्‍याम निसर्गावर अतिशय प्रेम करणारा लेखक आहे. इंग्रजी साहित्यात वर्डस्वर्थच्या साहित्यकृतीतून ही झलक दिसते. वर्डस्वर्थने जसं निसर्गावर भरभरून प्रेम केलं, तसंच श्‍यामनंही भरभरून लिहिलं आहे. श्‍यामनं जे लिहिलं त्यातून मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला'', या शब्दांत कौतुकाची थाप दिली आहे, महेश एलकुंचवार यांनी. प्रकाशन सोहळ्यात दोन दिग्गज "ऋतुस्पर्श" वर एवढं भरभरून बोलले. त्यामुळे त्यात नक्की काय आहे, यविषयी अनेकांची उत्सुकता शिगेला पोचली होती.

"ऋतूवेगळ्या माणसांच्या सहवासानं ऋतूंनाही दंभ चढतो. दंभांचा पसारा वाढत गेला की ऋतू उर्मट होतात. हळव्या जीवांच्या कोवळ्या स्वप्नांची त्यांना काळजी वाटत नाही. फुलावर सावली धरत कळ्यांची चिंता करण्याचंही ते मग नाकारतात. पाऊस थोडा उर्मट झाला की, नद्या बिनदिक्कत गावात शिरतात. पिकानं डवरलेलं रान वाहून नेतात. रडणारे डोळेदेखील अशा पावसात वाहून जातात....'' हे आहे "ऋतुस्पर्श"मधून व्यक्त झालेलं लेखकाचं मन.

"ऋतुस्पर्श'मधून फक्त निसर्गच व्यक्त झालाय असं नव्हे. त्यात आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे संदर्भही जिवंत होऊन नजरेपुढे येतात. यात बावरलेली गोरेटली सासुरवाशीण आहे, कावळ्यांची कावेबाज कावकाव आहे, कुस्त्यांचा फड आहे, दुलईतला मालकंस आहे, पहाटेचा काकडा आहे, पाटलाचा वाडा आहे... आणखीही बरंच काही. तेही अत्यंत दमदार. त्यात आगळी नजाकत आहे. एकतर या ललितबंधातील शब्द न शब्द सकस आहे. भाषा विलक्षण प्रभावी आहे, कारण ती प्रवाही आहे. भाषेचं वैभव काय असतं असं कुणी विचारलं तर "ऋतुस्पर्श'चा दाखला डोळे झाकून देता येईल. "ऋतुस्पर्श'मधील लिखाण डोळे मिटून निसर्ग आठवायला भाग पाडतं. आपणही याच निसर्गाच्या सोबतीनं वाढलो. आपल्याला ही नजर का लाभली नाही, याची कुठेतरी खंत वाटून जाते. निसर्गाच्या या खाणाखुणा अजूनही सभोवताल पसरल्या आहेत याची जाणीव होते. आणि पुस्तक वाचून होते तेव्हा जगाकडे पाहण्याची सहजसोपी परंतु अचाट दृष्टी लाभलेली असते. वि. स. खांडेकर, दुर्गा भागवत, शांता शेळके, ग्रेस, एलकुंचवार यांच्यासारख्या ज्येष्ठांनी या प्रकारच्या साहित्याचे दालन समृद्ध करून टाकले आहे. अशा अनेक इतर लेखकांनाही ऋतूंनी भूल पाडली आहे. "ऋतुस्पर्श' या ललितबंधात डोकावताना दुर्गाताईंच्या "ऋतुपर्वा'ची आठवण हमखास येते. त्यांनी ज्या पद्धतीने ऋतूंचा पट उलगडला आहे, तीच किंवा त्या शैलीच्या जवळ जाणारी धाटणी "ऋतुस्पर्श'मधून गवसते. या पुस्तकाचा एकूणच बाज प्रेमात पाडणारा आहे. विवक रानडे हा अफलातून माणूस आहे. श्‍याम पेठकरांचे निसर्गावरील ललितबंध विवेक रानडे यांच्या मुखपृष्ठामुळे अधिकच उत्कट झालेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. "ऋतुस्पर्श'ची मांडणी केवळ सुबक, देखणीच नव्हे तर हृदयस्पर्शी झाली आहे.

खरेतर, आजकाल ऋतू केव्हा येतात आणि जातात हेच समजेनासे झाले आहे. आधी लालबुंद पळस बहरला की ऋतूबदलाची जाणीव व्हायची. आता शिव्यांची लाखोली ऐकू आली की शिमगा आल्याचे कळते. रखरखीत उन्हाची फिकीर न करता चालणारी पावले सावली दिसली की आपसुक थबकायची. तो गारवा अंतर्मनात झिरपायचा. आजकाल मजल्यांच्या वाढत्या उंचीने सावली खरेदी करणारे नवे दूत निर्माण करून टाकले आहेत. "जमाना बदललाय', ही हाकाटी तशी नवी नाही. गर्दीच्या आणि गदारोळांच्या कायम वास्तव्याला अनेकांची मने सरावली आहेत. अशांच्या मनात गहिवरांचा दुष्काळ वाढतो आहे. अशावेळी निसर्गातील सात्विकता शोधली पाहिजे. पहाटे उठून दवबिंदू टिपले पाहिजेत. त्यासाठी वेळ काढावा लागतो. हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरवली आहे. वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे. यातील ऋतूबदलांची ताकद माणसांना बदलवायला लावेल. सुकलेले माळरान बघून हिरमुसलेल्या जीवांनी हे पुस्तक अवश्‍य वाचावे. यातील जांभळ्या मैनांशी हितगूज करावी, दवभरला दिवस अनुभवावा. थिजत जाणारे तळे काय असते हे समजून घ्यावे. रंगधून पारखावी, पाखरांची पावले शोधावी. निसर्गाशी एकजीवत्व साधणारी लेखकाची हातोटी तृप्त करून टाकणारी आहे.

अनेक मोठ्या लेखकांना बेदखल करून टाकण्याची परंपरा अलीकडे उदयास आली असे नाही. ती जुनीच आहे. नको तो ताळेबंद जपणाऱ्यांचा गोतावळा अनेक ठिकाणी आढळतो. अशांनी आधी "ऋतुस्पर्श' वाचावे. "मौसम केसाथ साथ बदल जाना चाहिये...' असे अब्बास दाना बडौदी म्हणतात. ते अनेकांना कळविण्याची गरज आहे. स्वतःचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊन आयुष्यभर तंडत राहणाऱ्यांनी तर "ऋतुस्पर्श' वाचलेच पाहिजे. अस्तित्व विसरून ओथंबून येण्यातही वेगळा आनंद असतो की नाही?

-श्रीपाद अपराजित
Posted by Picasa

Wednesday, June 20, 2007

पहिला पाऊस

वार्र्याचे श्वास ओलसर झाले की, मग पाऊस येतो. शिशिरात झाडं बोडकी होतात. वसंतात झाडं पानंपानं होतात. झाडांच्या काळसर निब्बर खोडांवर फुटलेली ही कोवळी हिरवी लव सावली धरायला लागली की, मग पावसाचे थेंब तोलून धरण्याची ताकद पानांमध्ये येते. पाऊस असा नेमक्या वेळी येतो. अवघ्या सजीवांची पाळंमुळं तहानली की, पाऊस येतो अन पाणी धरून ठेवायला जीथं मुळं असतील तिथेच टिकून राहतो. पावसाची हळवी, ओली, रौद्र, भिषण रुपं असू शकतात. पण पहिल्या पावसाचं मात्र तसं नसतं. जन्मदात्याबद्दल कृतज्ञतेचीही ओळख नसलेल्या अर्भकासारखा तो निरभ्र, निरागस असतो. हा पाऊस मनी ध्यानी नसतांना येतो. येईल, येईल अशी आशा विझत गेल्यावर, चिडचिड्या उन्हाशी परत जमवून घेण्याचा प्रयत्न करतांना मग पाऊस येतो.विरहाचे तडे गेलेल्या जमिनिचे उसासलेपण हुंगून पाऊस निघून जातो; पण येण्याचं वचन देऊन. रोडावलेल्या नदीच्या फाटक्या उराला थेंब थेंब टाके देतांना, पाऊस नदिच्या ओटीत पाण्याच्या दोन ओंजळी ओतून रेतीत पाय गाडून बसतो. अश्यावेळी नदिकाठची समाधिस्थ शिळा देखील हलकी होते. पावसाने नदीच्या वाळूत घर केलं की, नदीचा बांधा सुडौल होतो. पण एक होते- पहिल्याच पावसात नदिची वाट निसरडी होते. पावसाची नजर चुकवून आलेल्या एखाद्या चावट संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसण्याचा बहाणा कुणी करू नये.
पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. नवनिर्मितीचं हे बीज कुठेही असू शकतं. कसंही ते येऊ शकतं. डोळ्यांतल्या स्वप्नांची लिपी वाचण्याची कला जन्मजात अवगत असणार्र्या पाखरांच्या अस्तीत्त्वाशीच हे बीज सलगी करून असतं. पहिला पाऊस नेमकं ते हुडकून काढतो. परागंदा झालेल्या वासरांनी वाळीत टाकलेल्या गावातल्या वाड्याच्या कौलारू छतावरही मग पिंपळ साकारतो. कौलारू घरांच्या छतावर हिरवळ दाटून येते. हे निर्मितीचं बिज कुठेही असू शकतं. तुमच्या-आमच्या हृदयातही. म्हणूनच सहनशक्तीची परिक्षा घेऊन आलेला पहिला पाऊस पाऊसबावर्र्या मनात कविता जागवितो. नांगरलेल्या शेतातील तासांमधून हा पाऊस पळत सुटतो.
जीवनात अनेक पावसाळे पाहणार्र्या जख्ख जीवांना देखील पहिला पाऊस भेटतोच असे नाही. अवघा पावसाळा डोक्यावर घेत मोकळ्या आकाशाखाली फीरत राहिलं, तरी पहिला पाऊस भेटत नाही. हा पाऊस हटखोर असतो. पावसाचे थेंब ओंजळीत तोलून त्याचे मोती करता आले, तरच हा भेटतो. डोळ्यांत ढग साठवण्याचे कसब ज्याला साधले त्यालाच हा पाऊस भेटतो. मग तो कधीकधी पावसाळा सरतांनाही भेटतो. चिंबचिंब भिजून रिमझिमत राहण्याची शपथ तो देऊन जातो. एखाद्या गंगापूत्रालाही तो समरांगणी शरपंजरी पडला असतांना भेटतो. कुणाला भेटायचंच असेल तर तो ग्रीष्माच्या परसात घुसखोरी करूनही भेटतो. ज्याची नाळ मातीतच गाडली आहे, असे जीव अस्तीत्त्व नांगरून बसतात. ओसाड आभाळाकडे बघत त्यांच्या डोळ्यांमध्ये ग्रीष्म दाटून येतो. डोळे मीटताच मग पावसाच्या आठवणींचे तप्त कढ पापण्यांच्या कनातीतून बाहेर पडतात. अश्या हळव्या वेळी हा पाऊस अनवाणी पायांनी शेत तूडवीत ते कढ झेलून घेतो. असा पाऊस मग आभाळभर होतो. बांधावरच्या बूंध्याला टेकून पावसाची वाट पाहणार्र्याच्या आसूसल्या चेहर्र्याला पावसाचे थेंब कुरवाळतात. शेतामध्ये मग गोरा कुंभार नाचू लागतो. जमीन दाणे मागू लागते. अर्थात हे मागणं भरभरून देण्यासाठी असतं. घरट्यांवर पंख अंथरून पाखरं अंगाई गातात. मातीशी नातं असणार्र्यांची मग धावपळ सुरू होते. बैलांच्या पावलांनी जमीन लेकूरवाळी होते. चंद्रमौळी झोपडीचं छतही मग गोवर्धन होतं. पावसाच्या सार्र्या व्यथा छत झेलून घेतं. अशा पावसाला नाविन्याचा ध्यास असतो. पाऊस मग झोपडीच्या छतातून आत शिरतो. दुधपितं लेकरू आईजवळ सरकतं आणि गोठ्यातल्या गाईच्या निळ्या डोळ्यांत हिरवं रान उगवतं.
हा पहिला पाऊस ओसरला की, कुपावर कारल्याचा वेल काट्यांशी बोलू लागतो. रान गारगार होतं. वारा चिंबचिंब होतो. अंगावरची धूळ झटकून झाडं, पहिल्या रात्रीनंतर नुकत्याच न्हालेल्या नवपरिणीत वधूसारखी संपृक्त टवटवीत दिसतात. कौलारू छतंही आरशासारखी चकचकीत होतात. पहिला पाऊस असा धूळ झटक़णारा असतो. शरीरावरची आणि मनावरची देखील.

पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पहिला पाऊस गावात येण्याआधी गावाने सुकी लाकडे जमवून ठेवावी. ऐन पावसाळ्यात गावात कुणी मेलेच, तर अडचण नको. मरणाचे स्मरण असे नेणिवेच्या पातळीवर असतेच. वाढत्या वयाबरोबर हे धूके अधीक गडद होऊ लागते. मरणाशी नजरभेट झाली, की डोळ्यांना कोवळे अंकूर फूटत नाहीत. पाऊस नेहमीचाच अनुभवायचा असेल, तर जिवंत माणसांनी जातिवंत डोळे हिरव्या पानांआड दडवून ठेवावे. नाहितर मग पाऊस जाणिवेच्या पातळीवर येतच नाही. पेशींनी अंकूरण्याचे नाकारले की, जीवांना पावसाची धुंदी चढत नाही. अश्यंना पहिला पाऊस भेटूच शकत नाही. जाणिवा जीवंत ठेवल्या की, पाऊस पहिला होवून भेटतो. हा पाऊस असा कधीच भेटला नव्हता. ऐन पावसात इमारतीच्या गच्चीवर ऊभे राहून तीच्या केसात फुलं माळतांना सुद्धा पहिला पाऊस भेटला नव्हता. पाऊस कळायला लागण्यासाठी त्याची ओळख असावी लागते. ती करून घ्यावी लागते. पावसाचेही संस्कार करावे लागतात.
साडेतीन वर्षाची चीमुरडी. यंदा पाऊस कधी येणार?, हा प्रश्न घेऊन भिरभिरत होती. वार्र्याला सदाफूलीची ओंजळभर फुलं देऊन तीने त्यालाही प्रश्न विचारला होता. कोरडा वारा मुकपणे तीच्या बटांमध्ये बोटं फिरवून निघून गेला. प्रश्न कायम होता आणि ढगांकडेही उत्तर नव्हते. शापित गंधर्वाने आपल्या सखीसाठी मेघाला दिलेला निरोपही ईतका आर्त नसावा. पाऊस न अनुभवलेली चिमुरडी पावसाची वार्ता विचारत होती. तिला ईवल्याश्या मुठीत पाऊस साठवून ठेवायचा होता. अखेर तीच्या डोळ्यांच्या कडांवर हा प्रश्न सुकून गेला. गोबर्र्या गालांवर सुकलेल्या पाण्याची नक्षी तरारली, पण पाऊस आलाच नाही. घराच्या परसदारी, तूळशीपाशी, हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून ती बसून राहिली आणि वार्र्यालाही कळू न देता तो आला. एका टपोर्या थेंबाने कळूच तीच्या डोक्यावर टपली मारली. काय आहे? मग पाण्याच्या थेंबांची गर्दीच झाली. अंगणात एकेक थेंब जमिनित रूतून बसला. अगदी इतर वेळी तिने ते थेंब रांगोळी काढण्यासाठीच वापरले असते. थेंबांनी तीला गोंजारायला सुरूवात केली अन ती आनंदाने चित्कारली - "पाऊस आला!" तान्ह्या पावसात चिमुकलीसोबत भिजतांना अचानक जाणवलं, हा पहिला पाऊस आहे. पाऊसधारांनी बावरलेली ती, तिने इवल्याश्या हातांनी गळ्याभोवती गच्च मिठी मारली. कमरेभोवती पायांचा वेढा घातला अन पाऊसच कडेवर आल्यागत वाटले.
पहिला पाऊस असा अचानक भेटतो. साधना असावी लागते. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो. कधी तीला पाऊस भेटतो, तर कधी त्याला. दोघांनाही एकाच वेळी पाऊस भेटणं हा दैवदुर्लभ योग आहे. तिच्या मोकळ्या केसांमधून ओघळणारे पावसाचे मोती तो ओंजळीत वेचतो, तेव्हा पाऊस पहिटकर असतो. तिच्या केसांच्या सरी मग जीवन क्यापून टाकतात. पाऊस मग सरी विंचरून वेणी घालतो. हवंहवंसं बंधन घालणार्र्या शृंखलाच होतात तीच्या बटा. ते बंधन असलं तरी रेशमी असतं. आकाशी असतं. पाऊस असा भेटण्याचा तो एकच क्षण असतो. त्यानंतर त्याने तिचे केस पिळून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस येइल, पण तो पहिला नसेल.
पहिला पाऊस भेटतो रानात. मनात. आईच्या स्तनात. पहिला पाऊस मनाच्या चोरकप्प्यात दबा धरून बसलेला असतो. तो भेटण्यासाठी पावसाळाच असावा लागतो, असे नाही. रणरणत्या दुपारी दुसर्र्याचं उजागर सौभाग्य झालेली त्याची 'ती' त्याला भेटते, तेव्हा मनात दबा धरून बसलेला पहिला पाऊस अचानक कोसळू लागतो. अशा वेळी सावरणं कठीण असतं. पाऊस धरवत नाही आणि चिंब होता येत नाही, अशी केविलवाणी अवस्था असते. घरासमोरील अंगणात शेवंतीचं रोपटं लावतांना पाऊस हातातून वाट काढतो. ओणवं होऊन शेतात कापूस वेचतांना हाच पाऊस पाठीवर स्वार होतो. एखाद्या अंधार्र्या रात्री वारा खिडकीच्या तावदानांना धडका देत असतो आणि घरात आईचा निष्प्राण देह पडला असतो. त्या काजळ्या रात्रीही पहिला पाऊस कुंपणापाशी खिन्न बसला असतो. या पहिल्या पावसाची फुलं होतात. ती माळून ठेवता यायला हवीत.
Posted by Picasa

Friday, June 8, 2007

शिशिराचे चाळे


उन्हाला वसंताची चाहूल लागत असतांना शिशिर पानापानांमधून गळतीला लागला असतो. पानांचे पानपण सांभाळतांना वार्र्याचीही दमछाक होत असते. मग वार्र्याची वावटळ होते. गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडायला लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात. पाणी केव्हा तोडायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. खरंतर ज्यांना पिकवावं लागतं त्यांना शिकवावं लागत नाही.
हवा हळूवार कोरडी होते आणि पहाटेचं धूकं संकोच करू लागतं. पहाट अशी संकोचली, की गव्हाच्या ओंब्या दमदार दाण्यांनी ओथंबतात. गव्हाच्या रानातले बगळे गारवा सरत असतांना दूर रानात तळ्याच्या काठी समाधी लावायला निघून जातात. पाचोळा उडवीत वावटळ भर दुपारची गावात शिरते. गावतले सुगीचे सारेच संदर्भ आता संपलेले. सुगीचा हिशेबही आता जूना झालेला. घेण्यापेक्षा देण्याच्याच भावाने गाव पार वाकून गेलेलं. असा येण्या-जाण्याचा हिशेब गावाला ठेवता येत नाही. गावाचं घेणं तसं देण्यासाठीच असतं. संचीत सरलं तरी देणं मात्र बाकिच असतं. गावाची अशी वजाबाकी सुरु असतांना ऋतूचीत्र पालटून जातं.
गावात अशी वजाबाकी सुरु असतांना शिशिराला म्हातारचळ सुचलेलं. ऋतूंचे म्हातारचाळे तसे देखणे असतात, पण मनाच्या तळाशी एक एक विषण्ण शांतता पसरविणारे असतात. झाडांकडे आता गाळायलाही पानं नसतात. झाडं बेटी भलतीच करंटी वाटू लागतात. पण ऋतूंनी दिलेल्या करंटेपणातूनच वसंत फुलत असतो. गळून पडायला काहिच उरलं नाही, की मगच नवी पालवी फुटत असते. गमवायला काही शिल्लक नसलेलाच कमवू शकतो. शिशिर सरत असतांना झाडं फुलांनी पानांना भागत असतात. अशा दिवसातली दुपार तशी केविलवाणी असते. गावाचे शेतंही ओकीबोकी झालेली. पौषातल्या अश्या एखाद्या दुपारी पाखरं अचानक गावाकडे पाठ फिरवतात. सुगी सरली की, गावाकडे पाठ फिरवण्याची शिकवण पाखरांना पंख पसरण्याआधीच देण्यात येते. एखादी एकट टिटवी निसवलेल्या रानात मनातली हिरवळ डोळ्यात आणून सुगीचे संदर्भ टिपत असते. अशावेळी गावाला दुपारची झोप येत नाही. पण संपन्न सुस्तावलेपणाचा आव आणून गाव डोळे मिटून गप्पगार पहुडलेलं असतं. कडुनिंबाचे अखेरची काही पानं वार्र्याला दोष देत उगाच भिरभिरत जमिनिवर कोसळत असतात. पानांचा जीव जमिनीवर अंथरून झाडं अशी निष्पर्ण उभी असताना, भर दुपारी गावातल्या न्हात्या-धूत्या झालेल्या मुली कडुनिंबाच्या पारावर अंघोळ करीत बसतात. टिक्करबिल्ला खेळायच्या खापरानं त्या अंग घासत असतांना कडुनिंबाची नजर डोळ्यांसकट त्यांच्या वक्षावर गळून पडते. मुलींचा टिक्करबिल्ला केव्हाच सरलेला. पण खेळतांना बांधलेली रेघोट्यांची घरं मात्र डोळ्यांच्या पापणकाठावर सजीव झालेली. मुलींचं असं खेळण्या-बागडण्याचं वय शिशिराच्या अशा दुपारीच का सरतं, ते कळत नाही. अंगी वसंत फुलत असतांना शैशवाची कोवळी पानं अशी झडून गेलेली असतात.
गावाने पानगळ अशी आंगोपांगी गोंदवून घेवू नये. पानगळीची पुरेशी नोंद घेउन ती विसरायची असते. संदर्भासह जपुउन ठेवावे असे शिशिरात काहीच घडत नाही. वसंत तिच्या केसांत माळायचा नसतो, तसा शिशिरही डोळ्यांत भरायचा नसतो. तिन्ही ऋतू त्यांच्या संचीतासह क्षितिजावर पसरलेले असतात. पानगळही अशी हळूच मनात घर करते. झाडांचा धीर सुटला की पानगळ सुरु होते. ऋतूंचे असे गहिवर वहीच्या पानात जपून ठेवले की वहीची ती पानं केव्हाही छळतात. नको त्या वेळी वहीची पानं फडफडतात अन ऐन वसंतातही शिशिराचे चाळे सुरु होतात. हळद-कुंकू सांडवून पौषवारे वाळल्या पानांच्या ढिगामध्ये हरवून जातात. गारठवून टाकणारे वेडे वारे घेऊन माघ येतो. कापर्र्या वार्र्यांनी झाड६ चळाचळा कापतात. पांघरायला पानंही नसतात. हिरवेपण अनावर झालं की असं होणारच. मतलबी शुभ्र झळाळी घेऊन बगळे मग वृक्षांना सलाम ठोकतात. पानांच्या आठवणीत उसासे टाकणार्र्या झाडांच्या कोरड्या फांद्यांवर कावळ्यांची घरटी करपलेल्या वारकर्र्यांच्या कपाळी लावलेल्या बुक्क्यागत दिसतात. माघातले वारे कावळ्यांच्या घरट्यांशी छेडखानी करतात. ऋतू असे बेइमान झाले की गावाशी ईमान बाळगून असणारी ती काळी पाखरं बेभान होतात. वार्र्यावर चोचींनी प्रहार करण्याचा वेडेपणा करतात. कावळ्याची अस्वस्थ कावकाव या दिवसांत दुपार करपवून टाकते. दुपारच्या वामकुक्षीनंतर लगबगीनं दुकानाकडे जाणारा नामदेव शिंपी हातांचे वल्हे करून स्वतःच्याच डोक्यावरून फिरवीत जातो. माणसांच्या करंटेपणानेच गावावर पानगळ आली, हा त्या काळ्या पाखरांचा समज गावाच्या तीन पिढ्यांना काढता आलेला नाही. त्यांची घरटी असलेल्या निष्पर्ण झाडाखालून जाताना भागाबुढीचा डोळा कावळ्यांनी फोडल्याची कथा मात्र गाव वर्षानुवर्षे नव्या पिढीला सरत्या शिशिरात सांगत असते. भागाबुढी याच गावात नक्की रहायची का, ते कुणीच विचारत नाही. शिशिर चाळ्यांनी कावळे चीडले असतांना असले प्रश्न गावाला पडत नाही. कोळपलेल्या गढीच्या बुरुजावर अनाहूत वाढलेल्या कलत्या पिंपळावर बसून एका डोळ्याची कावळी मात्र बुबूळ गरगरा फिरवीत उजाडलेल्या गावाकडे बघत खंतावत असते. काटक्या झालेल्या झाडांवरील घरात वसंताचा गळा वाढवणार्र्या पाखरांनी शिशिराच्या चाळ्याची खंत करायची नसते. आपल्याच घरट्यात वसंत वाढतोय, हे पाखरांना कळू नये, हे पाखरंच प्राक्तन असतं. सुगी आटोपली की नदीचं पाणी आटण्याआधी घराची डागडुजी करून घ्यायची असते. मग माणसंही कामाला लागतात. गावच्या गढीची माती दुपारच्या एकान्तात चोरून नेतात. गावचा पाटिल म्हणे तालेवार होता. वाटण्या झाल्या तेव्हा तराजूने तोलून सोने वारसदारांमध्ये विभागले होते. गढीच्या खचलेल्या जाडजूड भिंतींमध्ये म्हणे सोन्याच्या लगडी लपवून ठेवल्या होत्या. पानगळीतल्या भयाण रात्री कुणीतरी एकटाच अंधारालाही ओळख न देता गढी खोदून सोन्याचा शोध घेतो. सुखाच्या शोधाचे असे कितीतरी खड्डे गढीभर पसरलेले आहेत. गढी आता पानं गाळून बसलेल्या झाडांसारखीच उजाड झालेली आहे.
पाटलाच्या गढीत वसंत कधी येणार, हा प्रश्न पाखरांनाही पडलेला. पाखरांच्या असंख्य पिढ्यांनी पाटलाच्या रंगमहालात उत्कट रसिकतेची मादक दरवळ बघीतली आहे. नशिबाची पानगळ आली आणि केवळ रसिकताच उरली. व्यक्त होण्यासाठी संपन्नता लागते. उपभोगाचे भोग मग पाटलाला छळू लागले. माघातल्या ओरबाडून टाकणार्र्या वार्र्यात शरीरही पिंजून निघालेले. मग रसिकता उपभोगाची दासी झाली. जीवनातले गुलजार वसंत छळतात अश्यावेळी! म्हातारा पाटिल वसंताच्या आठवणींनी बेभान व्हायचा. मग गावातल्या गरत्या घरच्या घरंदाज गृहिणींच्या पायातही चाळ बांधायला म्हातारा पाटिल धावू लागला. गावाच्या चीरेबंदीपणाला असे तडे जाऊ लागले. पाटलाच्या तालेवारपणाखाली वाकलेले गाव एक दिवस ताठ झाले. श्रीमंतीच्या आठवणीत खंगलेल्या पिढीनंही म्हातार्र्याविरुद्ध बंड केले. म्हातारा पाटिल आता गढीवरच्या वाड्यातल्या वरच्या खोलीत बंदिस्त. पानगळीने हैराण झालेल्या भणभणत्या माध्यान्हीला वेड्या पाटलाच्या डोळ्यांत वसंत नाचू लागतो. भोगलेल्या स्त्रीयांच्या नावाने पाटलाची कावकाव सुरु होते. वसंतसेनेच्या अनावृत्त अवयवांच्या रसभरीत वर्णनांनी पाटलांची बेताल बडबडही तालबद्ध होते.
शिशिराची पानगळ झेलत वसंत तेव्हा गावतळ्याकाठी निवांत बसलेला असतो. शिशिराचा प्रवेश संपला, की त्यालाच रंगमंचावर यायचे असते. असे प्रवेश ऋतूंना चुकूनही चुकवता येत नाहीत.
Posted by Picasa

Tuesday, June 5, 2007

स्वप्नऋतू

ऋतूंचे हल्ले समर्थपणे पेलता आले नाहीत तर आपण त्यांना निमूटपणे शरण जावे. तरीही ऋतूंनी दाखविलेल्या हळव्या स्वप्नांच्या फसव्या आवाहनांना भुलून जाऊ नये. कारण ऋतूंचे असे अस्मानफेक हल्ले कालमानाप्रमाणे सुरूच असतात. काळ काय ऋतूच्या स्वाधीन असतो? ऋतू काही काळ आपल्या प्रभावाने भारून टाकतात; पण मोसम बदलला की ऋतूंनाही जावेच लागते. कुठलेच ऋतू कुणाचेच नसतात. फुलांचे सुद्धा! ऋतूंचे तरी ऋतू असतात का? निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे ऋतू... आणि ऋतूंना पडलेलं स्वप्न म्हणजे वसंत. स्वाती नक्षत्राला सौंदर्याचं स्वप्न पडावं तशा सौंदर्याची उधळण करीतच वसंत येतो.
वसंत म्हणजे काळाची कोकीळ कंठातून आलेली सुरेल,पण व्याकूळ साद. रंगसाधर्म्यात स्वप्न हरवून बसलेल्या कोकिळेला पडलेली रंगभूल उतरण्याचा हा काळ. रंगांच्या मेळ्यात नेमका स्वतःचा रंग ओळखण्याची अदा या ऋतूत आहे. असा स्वतःचा नेमका रंग सापडला की, मग जीवनाचे सुर सापडणे तसे कठीण नसते. वसंत म्हणजे रंग गंध आणि स्वरांचे संधीपर्व. वार्षीक कालचक्राची ही सुरम्य संध्याकाळ. ही विग्रहाआधीची संधी असते. वेड्या फुलांच्या आवेगी फुलव्यावर रुढीवादी, उग्र म्हातार्र्यासारखा सुर्य कोपत जातो आणि स्वप्नांची निर्माल्य होतात. डोळ्यांच्या पापणकाठावर पानगळ सुरु होते. मोहोरण्याचा गुन्हा झाल्यागत. झाडेही बेटी भलतीच शांत उभी असतात. ग्रीष्मातली ही झाडं कुणाच्यातरी अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांसारखी दुःख पांघरल्यागत दांभिक वाटतात. सार्र्याच अस्तीत्त्वाचा पाचोळा होऊन गावकुसाच्या पायवाटेने वावटळत निघून जातो. आपण आपल्या अस्तीत्त्वाची राखड सावडत असतांनाच ऋतुचक्र फिरत असतं. कुठून तरी वार्र्याची मुजोर, पण थंड लहर येते. तिला पाण्याचा बेगुमान गंध असतो. आभाळ केविलवाणं झालं म्हणून उडून जाणारे पक्षीदेखील मग पंखात ओलावा वेचायला परततात आणि एका निसटत्या क्षणी मेघांना गहिवर येतो. धीर सुटल्यागत ते कोसळू लागतात. कामोत्सुक हरिणीसारखी जमिनही गंधवेडी होते. तो मीलनाचा गंध असतो. खरं सांगायचं तर वसंताचं बीज त्याचक्षणी रुजतं. मिलनाला दिलेला तो होकार आकार घेतो. पृथ्वी जडावते. शिशिर म्हणजे वसंतागमनासाठी लागलेले डोहाळेच. त्या गर्भारलेल्या क्षणांची स्वप्नवत फलश्रृती म्हणजे वसंत.

वसंतात मोहरल्या आंब्याखाली बसून सावलीची शाल पांघरून डोळे मिटून घेतले की, मनात सावळ्याच्या बासरीचे स्वर फिरायला लागतात. अश्या क्षणांना अगदी ठरवूनही नाकारता येत नाही. नकार आणि होकार दोनही आपल्या हातचे नसणारे असे क्षण नियती आपल्या ओच्यात टाकते. ती ऋतूभूल असते. असे क्षण आपण भोगतो, की ते क्षणच आपला उपभोग घेतात?... की आपण आणि असे गुलबास क्षण या दोहोंचीही संधी घडवून आणखी कुणी आपल्या आत मोहरत असतं? तसे संध्याकाळ म्हणजे नवनिर्मितीचे क्षण!
वसंतातली संध्याकाळ गावाकडच्या एकट चिरेबंदी वाड्यातून थरथरत्या पावलांनी गावामारूतीला दिवा लावायला एखादी जख्ख म्हातारी निघावी, तशीच वाटते. अशा वेळी मग केवळ जमिनच नव्हे तर आभाळही गावचे होते. बहरण्यासाठी कुठे वयाचं बंधन असतं? सांज कातर करत गेली आणि वसंतात मनमोगरा फुलला की केव्हाही बहरता येतं. वसंतात जीवाची फुलं होतात फुलांना बहर येतो. फुलं फुलण्याची मर्यादा तोडून फुलतात. असं बंधमुक्त फुलणं, हेच फुलांचं प्राक्तन असतं. फुलं ईतकी फुलतात की देठाचेही फुल होते. वसंताला फुलांची सवय असतेच. पण प्रत्येक फुलाला कुठे वसंताची सवय असते? मग वसंताची सवय नसणारी अशी फुले अस्वस्थ करतात. तिच्या गनर्र्यातील चाणाक्ष फुलांना मग डोळे फुटतात. एखाद्या कातर सांजेला वेल्हाळ झालेल्या पाखराला आवाहन देतात. थव्यापासून तुटलेलं असं पाखरू मग भरकटत जातं. तिच्या सावलीत मग मोगरा फुलतो. तिच्या पावलागणीक बकुळफुलांची ओंजळ जमिनिवर पसरते. वेडा वसंत तिला सांगत असतो, फुलं अशी वाटेवर उधळून द्यायची नसतात. अनोळखी पावलं हुरळून जातात. पण अश्या उधळल्या जाणार्र्या फुलांवर आणि हुरळून जाणार्र्या अनोळखी पावलांवर वसंताचा ताबा नसतो. फुलांच्या पायवाटेवरून तो तिचा ठावठीकाणा शोधून काढतोच. तुळस कृष्णकृष्ण होते. मत्त मंजीर्र्या सारंकाही मूकपणे जगाला सांगून टाकतात. प्रत्येक नदिची यमुना होते आणि बासरी वार्र्याच्या हाती सापडते. राधाबाधा झालेली ती मग बासरीच्या तानांनी वेडावते. मुग्ध ती, अबोल ती आणि तीच्या डोळ्यांच्या पाऊलवाटेवर आपलं गाव शोधणारा तो... काहीच कुणाच्या हाती नसतं. हात हाती गुंफतात आणि गाणं जन्माला येतं.

हे जीवनगाणं असतं. न संपणारं. अव्यय. अविनाशी. पायवाटेतून पळवाट शोधणारी फुलं हळवी ती आणि अनोळखी पावलं नेहमी तशीच असतात. पिढ्या बदलतात. सारं काही तेच आणि तसंच असतं. मग प्रत्येक वसंतात पहिल्यांदा फुललेलं ते गाणं आठवतं. ती अव्यक्त पण आवेगी प्रित आठवते. आठवते यमुना झालेली नदी आणि तिचं राधा होणं. भूल पाडणारी ती सावळी सांज आणि मन डोलविणार्र्या बासरीच्या ताना. श्यामरंगात न्हालेले ते क्षण कुठल्याही ऋतूत आठवले, तरीही तो वसंत होतो. वसंतानं एखाद्याला झपाटलं की, त्याच्या अवघ्या आयुष्याचा वसंत होतो. वसंताच्या चाहूलीनंही तिच्या रेशीमस्पर्शाची भावना अंगाअंगातून सळसळत जाते. अवघा देह मग एखाद्या श्रृंगारिक कोरीव लेण्यासारखा उन्मत्त होतो. तिच्या मेंदिभरल्या हाताच्या खुणा मग अंगभर गोंदून राहतात. वसंतात त्या शीण झटकून चटकदार होतात. प्रियतम मग आभाळ करून कवेत घेतो. चुंबनाच्या आठवणिने सारे कसे 'आफरीन आफरीन' होते. प्रत्येक पाकळीचे ओठ होतात. ऋतू बदलतात. झाडे पाने गाळून उध्वस्त होतात. फुलंही कोमेजतात; पण त्यांच्या संगतीनं उमललेले क्षण मात्र कोमेज़त नाहीत. त्या सदाबहार क्षणांचा हात धरून वसंतबहार परत फिरून येऊ शकते. मग गेल्या वसंताचा चावटपणा नव्या वसंतातील फुलं वार्र्याला सांगतात. वारा विचारतो- तू कुठं होतास तेव्हा? फूल मग ओठ दुमडून उगाचच हसतं. अवखळ वार्र्याला तिच्या पदराशी खेळण्याशिवाय दुसरं काय सुचणार? तिच्या ओंजळीत कोण होतं? वसंतात फुलं अशी बोलकी होणंही तसं बरोबर नसतं. नेमकं काय बोलायचं नि काय दडवून ठेवायचं, हे फुलांना कुठे कळतं? तसंही फुलांना काही हातचं राखून ठेवणं कुठे जमतं? पण रंग गंध, पराग, मध... सारं वाटून टाकतात म्हणून त्यांना परत भरभरून मिळतं. अश्या दिलदार फुलंची शेज गाववाटेवर पांघरून वसंत एखाद्या चांदण्या रात्री निघून जातो. कोकिळेची तान आभाळ गोंदवून गेली असते. वसंत-खेळ म्हणजे स्वप्न की वास्तव, या भ्रांतीत उन्ह तापायला लागतात. वारा बेभान होउन स्वप्नांच्या खाणाखूणा शोधत सैरभैर होतो. स्वप्नवेडात आणखी काय होणार?