Tuesday, June 5, 2007

स्वप्नऋतू

ऋतूंचे हल्ले समर्थपणे पेलता आले नाहीत तर आपण त्यांना निमूटपणे शरण जावे. तरीही ऋतूंनी दाखविलेल्या हळव्या स्वप्नांच्या फसव्या आवाहनांना भुलून जाऊ नये. कारण ऋतूंचे असे अस्मानफेक हल्ले कालमानाप्रमाणे सुरूच असतात. काळ काय ऋतूच्या स्वाधीन असतो? ऋतू काही काळ आपल्या प्रभावाने भारून टाकतात; पण मोसम बदलला की ऋतूंनाही जावेच लागते. कुठलेच ऋतू कुणाचेच नसतात. फुलांचे सुद्धा! ऋतूंचे तरी ऋतू असतात का? निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे ऋतू... आणि ऋतूंना पडलेलं स्वप्न म्हणजे वसंत. स्वाती नक्षत्राला सौंदर्याचं स्वप्न पडावं तशा सौंदर्याची उधळण करीतच वसंत येतो.
वसंत म्हणजे काळाची कोकीळ कंठातून आलेली सुरेल,पण व्याकूळ साद. रंगसाधर्म्यात स्वप्न हरवून बसलेल्या कोकिळेला पडलेली रंगभूल उतरण्याचा हा काळ. रंगांच्या मेळ्यात नेमका स्वतःचा रंग ओळखण्याची अदा या ऋतूत आहे. असा स्वतःचा नेमका रंग सापडला की, मग जीवनाचे सुर सापडणे तसे कठीण नसते. वसंत म्हणजे रंग गंध आणि स्वरांचे संधीपर्व. वार्षीक कालचक्राची ही सुरम्य संध्याकाळ. ही विग्रहाआधीची संधी असते. वेड्या फुलांच्या आवेगी फुलव्यावर रुढीवादी, उग्र म्हातार्र्यासारखा सुर्य कोपत जातो आणि स्वप्नांची निर्माल्य होतात. डोळ्यांच्या पापणकाठावर पानगळ सुरु होते. मोहोरण्याचा गुन्हा झाल्यागत. झाडेही बेटी भलतीच शांत उभी असतात. ग्रीष्मातली ही झाडं कुणाच्यातरी अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांसारखी दुःख पांघरल्यागत दांभिक वाटतात. सार्र्याच अस्तीत्त्वाचा पाचोळा होऊन गावकुसाच्या पायवाटेने वावटळत निघून जातो. आपण आपल्या अस्तीत्त्वाची राखड सावडत असतांनाच ऋतुचक्र फिरत असतं. कुठून तरी वार्र्याची मुजोर, पण थंड लहर येते. तिला पाण्याचा बेगुमान गंध असतो. आभाळ केविलवाणं झालं म्हणून उडून जाणारे पक्षीदेखील मग पंखात ओलावा वेचायला परततात आणि एका निसटत्या क्षणी मेघांना गहिवर येतो. धीर सुटल्यागत ते कोसळू लागतात. कामोत्सुक हरिणीसारखी जमिनही गंधवेडी होते. तो मीलनाचा गंध असतो. खरं सांगायचं तर वसंताचं बीज त्याचक्षणी रुजतं. मिलनाला दिलेला तो होकार आकार घेतो. पृथ्वी जडावते. शिशिर म्हणजे वसंतागमनासाठी लागलेले डोहाळेच. त्या गर्भारलेल्या क्षणांची स्वप्नवत फलश्रृती म्हणजे वसंत.

वसंतात मोहरल्या आंब्याखाली बसून सावलीची शाल पांघरून डोळे मिटून घेतले की, मनात सावळ्याच्या बासरीचे स्वर फिरायला लागतात. अश्या क्षणांना अगदी ठरवूनही नाकारता येत नाही. नकार आणि होकार दोनही आपल्या हातचे नसणारे असे क्षण नियती आपल्या ओच्यात टाकते. ती ऋतूभूल असते. असे क्षण आपण भोगतो, की ते क्षणच आपला उपभोग घेतात?... की आपण आणि असे गुलबास क्षण या दोहोंचीही संधी घडवून आणखी कुणी आपल्या आत मोहरत असतं? तसे संध्याकाळ म्हणजे नवनिर्मितीचे क्षण!
वसंतातली संध्याकाळ गावाकडच्या एकट चिरेबंदी वाड्यातून थरथरत्या पावलांनी गावामारूतीला दिवा लावायला एखादी जख्ख म्हातारी निघावी, तशीच वाटते. अशा वेळी मग केवळ जमिनच नव्हे तर आभाळही गावचे होते. बहरण्यासाठी कुठे वयाचं बंधन असतं? सांज कातर करत गेली आणि वसंतात मनमोगरा फुलला की केव्हाही बहरता येतं. वसंतात जीवाची फुलं होतात फुलांना बहर येतो. फुलं फुलण्याची मर्यादा तोडून फुलतात. असं बंधमुक्त फुलणं, हेच फुलांचं प्राक्तन असतं. फुलं ईतकी फुलतात की देठाचेही फुल होते. वसंताला फुलांची सवय असतेच. पण प्रत्येक फुलाला कुठे वसंताची सवय असते? मग वसंताची सवय नसणारी अशी फुले अस्वस्थ करतात. तिच्या गनर्र्यातील चाणाक्ष फुलांना मग डोळे फुटतात. एखाद्या कातर सांजेला वेल्हाळ झालेल्या पाखराला आवाहन देतात. थव्यापासून तुटलेलं असं पाखरू मग भरकटत जातं. तिच्या सावलीत मग मोगरा फुलतो. तिच्या पावलागणीक बकुळफुलांची ओंजळ जमिनिवर पसरते. वेडा वसंत तिला सांगत असतो, फुलं अशी वाटेवर उधळून द्यायची नसतात. अनोळखी पावलं हुरळून जातात. पण अश्या उधळल्या जाणार्र्या फुलांवर आणि हुरळून जाणार्र्या अनोळखी पावलांवर वसंताचा ताबा नसतो. फुलांच्या पायवाटेवरून तो तिचा ठावठीकाणा शोधून काढतोच. तुळस कृष्णकृष्ण होते. मत्त मंजीर्र्या सारंकाही मूकपणे जगाला सांगून टाकतात. प्रत्येक नदिची यमुना होते आणि बासरी वार्र्याच्या हाती सापडते. राधाबाधा झालेली ती मग बासरीच्या तानांनी वेडावते. मुग्ध ती, अबोल ती आणि तीच्या डोळ्यांच्या पाऊलवाटेवर आपलं गाव शोधणारा तो... काहीच कुणाच्या हाती नसतं. हात हाती गुंफतात आणि गाणं जन्माला येतं.

हे जीवनगाणं असतं. न संपणारं. अव्यय. अविनाशी. पायवाटेतून पळवाट शोधणारी फुलं हळवी ती आणि अनोळखी पावलं नेहमी तशीच असतात. पिढ्या बदलतात. सारं काही तेच आणि तसंच असतं. मग प्रत्येक वसंतात पहिल्यांदा फुललेलं ते गाणं आठवतं. ती अव्यक्त पण आवेगी प्रित आठवते. आठवते यमुना झालेली नदी आणि तिचं राधा होणं. भूल पाडणारी ती सावळी सांज आणि मन डोलविणार्र्या बासरीच्या ताना. श्यामरंगात न्हालेले ते क्षण कुठल्याही ऋतूत आठवले, तरीही तो वसंत होतो. वसंतानं एखाद्याला झपाटलं की, त्याच्या अवघ्या आयुष्याचा वसंत होतो. वसंताच्या चाहूलीनंही तिच्या रेशीमस्पर्शाची भावना अंगाअंगातून सळसळत जाते. अवघा देह मग एखाद्या श्रृंगारिक कोरीव लेण्यासारखा उन्मत्त होतो. तिच्या मेंदिभरल्या हाताच्या खुणा मग अंगभर गोंदून राहतात. वसंतात त्या शीण झटकून चटकदार होतात. प्रियतम मग आभाळ करून कवेत घेतो. चुंबनाच्या आठवणिने सारे कसे 'आफरीन आफरीन' होते. प्रत्येक पाकळीचे ओठ होतात. ऋतू बदलतात. झाडे पाने गाळून उध्वस्त होतात. फुलंही कोमेजतात; पण त्यांच्या संगतीनं उमललेले क्षण मात्र कोमेज़त नाहीत. त्या सदाबहार क्षणांचा हात धरून वसंतबहार परत फिरून येऊ शकते. मग गेल्या वसंताचा चावटपणा नव्या वसंतातील फुलं वार्र्याला सांगतात. वारा विचारतो- तू कुठं होतास तेव्हा? फूल मग ओठ दुमडून उगाचच हसतं. अवखळ वार्र्याला तिच्या पदराशी खेळण्याशिवाय दुसरं काय सुचणार? तिच्या ओंजळीत कोण होतं? वसंतात फुलं अशी बोलकी होणंही तसं बरोबर नसतं. नेमकं काय बोलायचं नि काय दडवून ठेवायचं, हे फुलांना कुठे कळतं? तसंही फुलांना काही हातचं राखून ठेवणं कुठे जमतं? पण रंग गंध, पराग, मध... सारं वाटून टाकतात म्हणून त्यांना परत भरभरून मिळतं. अश्या दिलदार फुलंची शेज गाववाटेवर पांघरून वसंत एखाद्या चांदण्या रात्री निघून जातो. कोकिळेची तान आभाळ गोंदवून गेली असते. वसंत-खेळ म्हणजे स्वप्न की वास्तव, या भ्रांतीत उन्ह तापायला लागतात. वारा बेभान होउन स्वप्नांच्या खाणाखूणा शोधत सैरभैर होतो. स्वप्नवेडात आणखी काय होणार?

No comments: