Sunday, June 24, 2007

बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट

 

(ऋतुस्पर्श या पुस्तकावर सकाळ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजीत यांचे समिक्षण!)

हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरविली आहे.
वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे.

"गेल्या हजार वर्षांच्या मराठी साहित्याच्या पसाऱ्यात शब्दांच्या आणि शब्दामधून मांडण्यात येणाऱ्या भावनांच्या ज्या खेळ्या मांडल्या गेल्या त्यात श्रीमान संत ज्ञानेश्‍वरांच्या खेळ्या अप्रतिम आहेत. शब्दांची रचना, भावनांची रचना; त्यासाठी वापरायच्या चपखल आणि जिव्हारी जाऊन बसणाऱ्या प्रतिमा आणि प्रतीकं याबाबतीत ज्ञानेश्‍वर माउलीला तोड नाही....शब्दांच्या, भावनांच्या, प्रतिमांच्या, प्रतीकांच्या बाबतीत आधुनिक काळात श्‍याम पेठकर माउलीची उंची गाठू पाहतात, असं मला वाटतं.''...."ऋतुस्पर्श'च्या प्रकाशन सोहळ्यातील राजन खान यांचे हे वाक्‍य मला अजूनही विसरता येत नाही. अलीकडच्या काळात एखाद्या साहित्यकृतीची तुलना करताना एवढं दिलदार आणि दिलखुलास होणं भल्याभल्यांना जमलेलं नाही. राजन खान हे नाव अपरिचित नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकानं ही दिलेरी दाखविली तेव्हा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित होते. "मौनराग'मधून स्वतःचे आस्वादक आयुष्य ताकदीने मांडणाऱ्या एलकुंचवारांच्या साक्षीनं त्यांनी श्‍याम पेठकरांना ही पावती दिली. मुख्य म्हणजे, राजन खान यांनी हे भाषण मुद्दाम लिहून आणलं होतं. मी असं बोललोच नाही, अशी म्हणण्याची वेळ येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली होती.

"श्‍याम निसर्गावर अतिशय प्रेम करणारा लेखक आहे. इंग्रजी साहित्यात वर्डस्वर्थच्या साहित्यकृतीतून ही झलक दिसते. वर्डस्वर्थने जसं निसर्गावर भरभरून प्रेम केलं, तसंच श्‍यामनंही भरभरून लिहिलं आहे. श्‍यामनं जे लिहिलं त्यातून मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला'', या शब्दांत कौतुकाची थाप दिली आहे, महेश एलकुंचवार यांनी. प्रकाशन सोहळ्यात दोन दिग्गज "ऋतुस्पर्श" वर एवढं भरभरून बोलले. त्यामुळे त्यात नक्की काय आहे, यविषयी अनेकांची उत्सुकता शिगेला पोचली होती.

"ऋतूवेगळ्या माणसांच्या सहवासानं ऋतूंनाही दंभ चढतो. दंभांचा पसारा वाढत गेला की ऋतू उर्मट होतात. हळव्या जीवांच्या कोवळ्या स्वप्नांची त्यांना काळजी वाटत नाही. फुलावर सावली धरत कळ्यांची चिंता करण्याचंही ते मग नाकारतात. पाऊस थोडा उर्मट झाला की, नद्या बिनदिक्कत गावात शिरतात. पिकानं डवरलेलं रान वाहून नेतात. रडणारे डोळेदेखील अशा पावसात वाहून जातात....'' हे आहे "ऋतुस्पर्श"मधून व्यक्त झालेलं लेखकाचं मन.

"ऋतुस्पर्श'मधून फक्त निसर्गच व्यक्त झालाय असं नव्हे. त्यात आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे संदर्भही जिवंत होऊन नजरेपुढे येतात. यात बावरलेली गोरेटली सासुरवाशीण आहे, कावळ्यांची कावेबाज कावकाव आहे, कुस्त्यांचा फड आहे, दुलईतला मालकंस आहे, पहाटेचा काकडा आहे, पाटलाचा वाडा आहे... आणखीही बरंच काही. तेही अत्यंत दमदार. त्यात आगळी नजाकत आहे. एकतर या ललितबंधातील शब्द न शब्द सकस आहे. भाषा विलक्षण प्रभावी आहे, कारण ती प्रवाही आहे. भाषेचं वैभव काय असतं असं कुणी विचारलं तर "ऋतुस्पर्श'चा दाखला डोळे झाकून देता येईल. "ऋतुस्पर्श'मधील लिखाण डोळे मिटून निसर्ग आठवायला भाग पाडतं. आपणही याच निसर्गाच्या सोबतीनं वाढलो. आपल्याला ही नजर का लाभली नाही, याची कुठेतरी खंत वाटून जाते. निसर्गाच्या या खाणाखुणा अजूनही सभोवताल पसरल्या आहेत याची जाणीव होते. आणि पुस्तक वाचून होते तेव्हा जगाकडे पाहण्याची सहजसोपी परंतु अचाट दृष्टी लाभलेली असते. वि. स. खांडेकर, दुर्गा भागवत, शांता शेळके, ग्रेस, एलकुंचवार यांच्यासारख्या ज्येष्ठांनी या प्रकारच्या साहित्याचे दालन समृद्ध करून टाकले आहे. अशा अनेक इतर लेखकांनाही ऋतूंनी भूल पाडली आहे. "ऋतुस्पर्श' या ललितबंधात डोकावताना दुर्गाताईंच्या "ऋतुपर्वा'ची आठवण हमखास येते. त्यांनी ज्या पद्धतीने ऋतूंचा पट उलगडला आहे, तीच किंवा त्या शैलीच्या जवळ जाणारी धाटणी "ऋतुस्पर्श'मधून गवसते. या पुस्तकाचा एकूणच बाज प्रेमात पाडणारा आहे. विवक रानडे हा अफलातून माणूस आहे. श्‍याम पेठकरांचे निसर्गावरील ललितबंध विवेक रानडे यांच्या मुखपृष्ठामुळे अधिकच उत्कट झालेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. "ऋतुस्पर्श'ची मांडणी केवळ सुबक, देखणीच नव्हे तर हृदयस्पर्शी झाली आहे.

खरेतर, आजकाल ऋतू केव्हा येतात आणि जातात हेच समजेनासे झाले आहे. आधी लालबुंद पळस बहरला की ऋतूबदलाची जाणीव व्हायची. आता शिव्यांची लाखोली ऐकू आली की शिमगा आल्याचे कळते. रखरखीत उन्हाची फिकीर न करता चालणारी पावले सावली दिसली की आपसुक थबकायची. तो गारवा अंतर्मनात झिरपायचा. आजकाल मजल्यांच्या वाढत्या उंचीने सावली खरेदी करणारे नवे दूत निर्माण करून टाकले आहेत. "जमाना बदललाय', ही हाकाटी तशी नवी नाही. गर्दीच्या आणि गदारोळांच्या कायम वास्तव्याला अनेकांची मने सरावली आहेत. अशांच्या मनात गहिवरांचा दुष्काळ वाढतो आहे. अशावेळी निसर्गातील सात्विकता शोधली पाहिजे. पहाटे उठून दवबिंदू टिपले पाहिजेत. त्यासाठी वेळ काढावा लागतो. हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरवली आहे. वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे. यातील ऋतूबदलांची ताकद माणसांना बदलवायला लावेल. सुकलेले माळरान बघून हिरमुसलेल्या जीवांनी हे पुस्तक अवश्‍य वाचावे. यातील जांभळ्या मैनांशी हितगूज करावी, दवभरला दिवस अनुभवावा. थिजत जाणारे तळे काय असते हे समजून घ्यावे. रंगधून पारखावी, पाखरांची पावले शोधावी. निसर्गाशी एकजीवत्व साधणारी लेखकाची हातोटी तृप्त करून टाकणारी आहे.

अनेक मोठ्या लेखकांना बेदखल करून टाकण्याची परंपरा अलीकडे उदयास आली असे नाही. ती जुनीच आहे. नको तो ताळेबंद जपणाऱ्यांचा गोतावळा अनेक ठिकाणी आढळतो. अशांनी आधी "ऋतुस्पर्श' वाचावे. "मौसम केसाथ साथ बदल जाना चाहिये...' असे अब्बास दाना बडौदी म्हणतात. ते अनेकांना कळविण्याची गरज आहे. स्वतःचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊन आयुष्यभर तंडत राहणाऱ्यांनी तर "ऋतुस्पर्श' वाचलेच पाहिजे. अस्तित्व विसरून ओथंबून येण्यातही वेगळा आनंद असतो की नाही?

-श्रीपाद अपराजित
Posted by Picasa

1 comment:

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर