Tuesday, September 25, 2007

ईसाप आणि बालकवींचा ऋतूस्पर्श!


प्रत्येक ऋतुत निसर्गात वेगवेगळे लक्षणिय बदल होतात आणि याचा परिणाम माणसांवर होतो. कधीतरी हे बदल माणसाला आकर्षून घेतात. त्याल ऋतुचा स्पर्श होतो, आणि....

- साप्ताहीक लोकप्रभा मध्ये नुकतेच प्रकाशीत झालेले श्री. प्रमोद चुंचूवार यांचे समिक्षण.

सध्या या समिक्षणातील काही अंश प्रकाशीत करीत आहोत. संपुर्ण समिक्षण वाचण्यासाठी टीचकी मारा


कुबेराने आपला खजीना उधळून द्यावा किंवा, आकाशात एकाच वेळी हजारो ईंद्रधनुष्ये उमलून यावित तश्या अनेक प्रतिमा, हृदयस्पर्षी कल्पना आणि रुपकांचा खजीना पुस्तकभर विखुरलेला आहे. 'चाफा आरक्त होत मुकपणे बोलू लागलेला असतो, तेव्हा चित्र प्रकटला असतो.... आंब्याचा मोहर लाज लाजून फळला असतो, तेव्हा चैत्र अवतरित झाला असतो.' सौंदर्याचं तत्वज्ञान शिकण्यासाठी चैत्राला शरण जावं, असं सांगत लेखक चैत्राचं चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभं करतो. निसर्गाचं सौंदर्ये रसिकपणे टिपता त्या सौंदर्यावरच हावरटपणे तुटून पडणार्र्या माणसाच्या वैगुण्यावर हे ललितबंध नेमके बोट ठेवतात. आणि म्हणूनच केवळ ललित साहित्य किंवा निसर्ग साहित्य या चौकटीत ऋतूस्पर्शचे विश्लेषण करता सामाजीक अंगानं या साहित्याचं विश्लेषण करावं लागतं. महात्मा गांधी म्हणतात की निसर्गे माणसाच्या गरजा भागवू शकतो, पण त्याची हाव भागवू शकत नाही. ऋतूस्पर्श या ललित बंधात हाच संदेश पटवून देण्यासाठी निसर्गाचं अद्वीतीय अंतरच लेखकानं उलगडून दाखवलं आहे. कारण माणूस सौंदर्याचा पुजक या नात्यानं आस्वाद घेऊ शकतो, आणि त्याला सौंदर्य एकदा पटलं की, तो शांततेच्या निसर्गाच्या कुशीत जगायला शिकेल. निसर्गाला ओरबाडणार नाही. ऋतूस्पर्शाच्या मागची प्रेरणा बहुधा हिच असावी. पण केवळ ऋतुंच्या अवस्थेचं निरिक्षण हे ललितबंध नोंदवत नाहीत, मोगरा, चाफा यांसारख्या यासारख्या ललितबंधातुन लेखक या फुलांकडे पहाण्याची नविच सौंदर्यदृष्टी आपल्याला प्रदान करतो. आणि मानवी समाजातही आपल्या आजूबाजूला मोगरे आणि चाफे आहेत, याची प्रचीती देतो. त्यांचा सुगंध सहवास मिळण्याची प्रेरणा देतो, स्थीतप्रज्ञ म्हटले की, श्रीक्रुष्णाचं नाव आपल्या डोळ्यांपुढे येतं. पण त्याही आधी, हजारो वर्षांपासून एक फुल स्थीतप्रज्ञाचं जीणं कसं असावं याचा प्रत्यय देत आहे, ते म्हणजे चाफा. या सर्व ललितबंधांमध्ये प्रतिकात्मकता प्रतिभा यांचा कळसच साधला आहे. मोगरा हा लेख म्हणजे तर मास्टरस्ट्रोकच. केवळ वेणीत माळलं जाणारं शृंगारीक फुल म्हणजे मोगरा, एवढीच ओळख असलेल्या या फुलाचं वेगळं रुपच लेखक दाखवून देतो. खडतर परिस्थीतीत फुलण्याचं, योग्य वेळी समर्पीत आणि सन्यस्तही होण्याचं प्रतीक म्हणजे मोगरा. मोगर्र्याच्या जन्माबाबतचं लेखकाचं निरिक्षण तर अचंबीत करणारं आहे. "ऋतू तापत जातो. भोगाचे अनुताप विद्रुप होत जातात. सारं सारं चीरडून टाकण्याच्या अवस्थेत फुलांनी कसं फुलावं? फुलांक़डे आर्त सुगंध असतो, हळवे रंग असतात, पण तापट अन्यायाला करडा विरोध करण्याचं धैर्य नसतं. पण अशा जाळून टाकणार्र्या तहानलेल्या वातावरणात मोगरा मात्र धैर्यानं फुलतो. तेजाचा ताप चळत असतांना मोगरा तेजाचं ओज ग्रहण करतो. जळणं आणि उजळणं यातील फरक मोगर्र्याच्या अगदी सहज जाणिवेच्या पातळीवर असतो.
सध्या आपण पावसाळा अनुभवतोय. पहिल्या पावसाला लेखकाने कसं शब्दात नेमकं पकडलंय ते बघा पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो.
निसर्गावर विजय मिळवून त्याला गुलाम करण्यासाठी माणसाचा सध्या सर्व पातळ्यांवर आटापिटा सुरु आहे, मात्र अशा अंदाधुंद प्रगतिची कोणती फळं आपल्याला भोगावी लागतील, याचा तत्वचींतकासारखा ईशाराच लेखक देतो.
"माणसांच्या आज्ञेत वाढणारी झाडं नेहमीच केविलवाणी असतात. झाडांच्या सावलीत वाढणारी माणसं मात्र सदाबहार असतात." निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातेसंबंधाबाबत चिरकालीन सुभाषीत ठरेल, या ताकदिचं हे वाक्य पेठकरच लिहू जाणोत. "फुलांशी मैत्री करता आली, तर मग ते तुम्हाला प्रत्येक ऋतूच्या खाणाखूणा सांगतात. प्रत्येक ऋतुची एक गोंदणलिपी असते." असं लेखक जेव्हा आपल्याला सांगतो, तेव्हा आपल्याला ऋतुस्पर्श ची ओळ ओळच एक विस्मयकारी प्रत्यय देते. तो म्हणजे, लेखकाची पाना-फुलाशी मैत्री झालीय अन त्याला केवळ ऋतूचीच नाही, तर माणसाच्या स्वभावाचीदेखील गोंदणलिपी वाचता येते.
तुमच्यातला हळवा, संवेदनशील माणूस कॉंक्रीटच्या जंगलात हरवला नसेल, आणि ही गोंदणलिपी तुम्हालाही समजून घ्यायची असेल, तर ऋतुस्पर्श वाचायलाच हवा. कारण आपल्याला केवीलवाणा निसर्ग नको, तर सदाबहार मानवी समाज हवा आहे.

1 comment:

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तूम्ही सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर .