Tuesday, February 5, 2008
Friday, December 21, 2007
"ऋतूस्पर्श" कार श्याम पेठकरांना भैरोरतन दमाणि पुरस्कार प्रदान!

भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार त्यांच्यासह यशोधरा काटकर यांना "थर्ड पर्सन' या कथासंग्रहाबद्दल आणि भिन्न' कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे होते. उद्योगपती प्रेमरतन दमाणी, नवरतन दमाणी, पुरस्कार समितीचे निमंत्रक रामदास फुटाणे आणि महापौर अरुणा वाकसे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. रु.२५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण गांधीजींच्या विचाराकडे पाठ फिरवली, पण आपल्याला खाते- पिते, समृध्द गाव उभे करायचे असेल तर कचकड्याच्या आयुष्यापासून दूर जाऊन निसर्गाकडे वाटचाल केली पाहिजे, असे मत लेखक श्याम पेठकर यांनी व्यक्त केले. झाडांचे हात, वेलींची साथ आणि फुलांची पायवाट सोडून दिल्याने निर्माण झालेली आत्महत्या करायला लावणारी स्थिती बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
विशिष्ट लेखनाचे साचे मोडून टाकणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांची निवड पुरस्कारासाठी केल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द.हातकणंगलेकर यांनी पुरस्कार निवड समितीचे कौतूक केले. दाहक वास्तवाला भिडणाऱ्या लेखकांची नवी पिढी निर्माण होत आहे, त्याचे समाधान होत आहे, असे ते म्हणाले. मराठी साहित्यात या तीन पुस्तकांनी क्रांती घडवली आहे, असे नमूद करून केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या पुस्तकातील वास्तवाच्या आगीचे चटके दाहक असल्याचे सांगितले.
प्रारंभी उद्योगपती नवरतन दमाणी यांनी प्रास्तविक केले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी नेटके सूत्रसंचालन केले. निवड समितीचे सदस्य कवी दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, द.ता.भोसले, शरदकुमार एकबोटे, डॉ. गीता जोशी, राजेंद्र दास यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
Sunday, December 2, 2007
ऋतुस्पर्श ला प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी पुरस्कार...

श्याम पेठकर यांचा ‘ ऋतुस्पर्श ’ हा ललित लेखसंग्रह यांना यंदाचा मराठी साहित्यात प्रतिष्ठेचा मानला जाणारा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समिताचे अध्यक्ष, उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरात ही घोषणा केली. पंधरा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे एकोणिसावे वर्ष आहे.
१६ डिसेंबर रोजी इथल्या हुतात्मा स्मृती मंदिरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येतील.
पुरस्कार वितरण समारंभानंतर रात्री नामवंत गझलकारांच्या गझलांचा "आभाळ चांदण्यांचे' हा कार्यक्रम होणार आहे. माधव भागवत, सुचिता भागवत यांचे गायन आणि भाऊ मराठे यांचे निवेदन यात असेल.
पुरस्कार निवड समितीत दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. द. ता. भोसले, शरदकुमार एकबोटे, प्रा. राजेंद्र दास व डॉ. गीता जोशी यांचा समावेश आहे. सुमारे दिडशेहुन अधीक साहित्यकृतींतुन या पुरस्कारासाठी ऋतुस्पर्श ची निवड करण्यात आलेली आहे. हलसगिकर यांनी सांगीतले, की सामाजीकता, संवेदनशीलता, विचार आणि लालित्य यांचा विचार करून यंदाच्या पुरस्कारासाठी साहित्यकृतींची निवड करण्य़ात आलेली आहे. श्याम पेठकरांचा ऋतुस्पर्श निसर्गातील विविध पैलुंचे रमणिय दर्शन वाचकांना घडवतो, असे ते म्हणाले.
यापुर्वी हा पुरस्कार मंगेश पाडगावकर, वसंत बापट, डॉ. निर्मलकुमार फडकुले,आदी मान्यवरांना मिळालेला आहे.
नागपुरातून मात्र केवळ कविवर्य ग्रेस आणि कवी लोकनाथ यशवंत यांनाच हा पुरस्कार मिळाला होता.
श्याम पेठकर हे हा पुरस्कार 'ललितसाहित्य' या क्षेत्रात मिळवणारे विदर्भातील पहिलेच लेखक आहेत. शिवाय पत्रकारीता या क्षेत्रात कार्यरत असलेले महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती आहेत.
या उपलब्धीबद्दल श्याम पेठकरांचे हार्दीक अभिनंदन!
Tuesday, September 25, 2007
ईसाप आणि बालकवींचा ऋतूस्पर्श!

प्रत्येक ऋतुत निसर्गात वेगवेगळे लक्षणिय बदल होतात आणि याचा परिणाम माणसांवर होतो. कधीतरी हे बदल माणसाला आकर्षून घेतात. त्याल ऋतुचा स्पर्श होतो, आणि....
- साप्ताहीक लोकप्रभा मध्ये नुकतेच प्रकाशीत झालेले श्री. प्रमोद चुंचूवार यांचे समिक्षण.
सध्या या समिक्षणातील काही अंश प्रकाशीत करीत आहोत. संपुर्ण समिक्षण वाचण्यासाठी टीचकी मारा
कुबेराने आपला खजीना उधळून द्यावा किंवा, आकाशात एकाच वेळी हजारो ईंद्रधनुष्ये उमलून यावित तश्या अनेक प्रतिमा, हृदयस्पर्षी कल्पना आणि रुपकांचा खजीना पुस्तकभर विखुरलेला आहे. 'चाफा आरक्त होत मुकपणे बोलू लागलेला असतो, तेव्हा चित्र प्रकटला असतो.... आंब्याचा मोहर लाज लाजून फळला असतो, तेव्हा चैत्र अवतरित झाला असतो.' सौंदर्याचं तत्वज्ञान शिकण्यासाठी चैत्राला शरण जावं, असं सांगत लेखक चैत्राचं चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभं करतो. निसर्गाचं सौंदर्ये रसिकपणे न टिपता त्या सौंदर्यावरच हावरटपणे तुटून पडणार्र्या माणसाच्या वैगुण्यावर हे ललितबंध नेमके बोट ठेवतात. आणि म्हणूनच केवळ ललित साहित्य किंवा निसर्ग साहित्य या चौकटीत ऋतूस्पर्शचे विश्लेषण न करता सामाजीक अंगानं या साहित्याचं विश्लेषण करावं लागतं. महात्मा गांधी म्हणतात की निसर्गे माणसाच्या गरजा भागवू शकतो, पण त्याची हाव भागवू शकत नाही. ऋतूस्पर्श या ललित बंधात हाच संदेश पटवून देण्यासाठी निसर्गाचं अद्वीतीय अंतरच लेखकानं उलगडून दाखवलं आहे. कारण माणूस सौंदर्याचा पुजक या नात्यानं आस्वाद घेऊ शकतो, आणि त्याला सौंदर्य एकदा पटलं की, तो शांततेच्या निसर्गाच्या कुशीत जगायला शिकेल. निसर्गाला ओरबाडणार नाही. ऋतूस्पर्शाच्या मागची प्रेरणा बहुधा हिच असावी. पण केवळ ऋतुंच्या अवस्थेचं निरिक्षण हे ललितबंध नोंदवत नाहीत, मोगरा, चाफा यांसारख्या यासारख्या ललितबंधातुन लेखक या फुलांकडे पहाण्याची नविच सौंदर्यदृष्टी आपल्याला प्रदान करतो. आणि मानवी समाजातही आपल्या आजूबाजूला मोगरे आणि चाफे आहेत, याची प्रचीती देतो. त्यांचा सुगंध व सहवास मिळण्याची प्रेरणा देतो, स्थीतप्रज्ञ म्हटले की, श्रीक्रुष्णाचं नाव आपल्या डोळ्यांपुढे येतं. पण त्याही आधी, हजारो वर्षांपासून एक फुल स्थीतप्रज्ञाचं जीणं कसं असावं याचा प्रत्यय देत आहे, ते म्हणजे चाफा. या सर्व ललितबंधांमध्ये प्रतिकात्मकता व प्रतिभा यांचा कळसच साधला आहे. मोगरा हा लेख म्हणजे तर मास्टरस्ट्रोकच. केवळ वेणीत माळलं जाणारं शृंगारीक फुल म्हणजे मोगरा, एवढीच ओळख असलेल्या या फुलाचं वेगळं रुपच लेखक दाखवून देतो. खडतर परिस्थीतीत फुलण्याचं, योग्य वेळी समर्पीत आणि सन्यस्तही होण्याचं प्रतीक म्हणजे मोगरा. मोगर्र्याच्या जन्माबाबतचं लेखकाचं निरिक्षण तर अचंबीत करणारं आहे. "ऋतू तापत जातो. भोगाचे अनुताप विद्रुप होत जातात. सारं सारं चीरडून टाकण्याच्या अवस्थेत फुलांनी कसं फुलावं? फुलांक़डे आर्त सुगंध असतो, हळवे रंग असतात, पण तापट अन्यायाला करडा विरोध करण्याचं धैर्य नसतं. पण अशा जाळून टाकणार्र्या तहानलेल्या वातावरणात मोगरा मात्र धैर्यानं फुलतो. तेजाचा ताप चळत असतांना मोगरा तेजाचं ओज ग्रहण करतो. जळणं आणि उजळणं यातील फरक मोगर्र्याच्या अगदी सहज जाणिवेच्या पातळीवर असतो.
सध्या आपण पावसाळा अनुभवतोय. पहिल्या पावसाला लेखकाने कसं शब्दात नेमकं पकडलंय ते बघा पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो.
निसर्गावर विजय मिळवून त्याला गुलाम करण्यासाठी माणसाचा सध्या सर्व पातळ्यांवर आटापिटा सुरु आहे, मात्र अशा अंदाधुंद प्रगतिची कोणती फळं आपल्याला भोगावी लागतील, याचा तत्वचींतकासारखा ईशाराच लेखक देतो.
"माणसांच्या आज्ञेत वाढणारी झाडं नेहमीच केविलवाणी असतात. झाडांच्या सावलीत वाढणारी माणसं मात्र सदाबहार असतात." निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातेसंबंधाबाबत चिरकालीन सुभाषीत ठरेल, या ताकदिचं हे वाक्य पेठकरच लिहू जाणोत. "फुलांशी मैत्री करता आली, तर मग ते तुम्हाला प्रत्येक ऋतूच्या खाणाखूणा सांगतात. प्रत्येक ऋतुची एक गोंदणलिपी असते." असं लेखक जेव्हा आपल्याला सांगतो, तेव्हा आपल्याला ऋतुस्पर्श ची ओळ न ओळच एक विस्मयकारी प्रत्यय देते. तो म्हणजे, लेखकाची पाना-फुलाशी मैत्री झालीय अन त्याला केवळ ऋतूचीच नाही, तर माणसाच्या स्वभावाचीदेखील गोंदणलिपी वाचता येते.
तुमच्यातला हळवा, संवेदनशील माणूस कॉंक्रीटच्या जंगलात हरवला नसेल, आणि ही गोंदणलिपी तुम्हालाही समजून घ्यायची असेल, तर ऋतुस्पर्श वाचायलाच हवा. कारण आपल्याला केवीलवाणा निसर्ग नको, तर सदाबहार मानवी समाज हवा आहे.
Sunday, June 24, 2007
बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट
(ऋतुस्पर्श या पुस्तकावर सकाळ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजीत यांचे समिक्षण!)
हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरविली आहे.
वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे.
"गेल्या हजार वर्षांच्या मराठी साहित्याच्या पसाऱ्यात शब्दांच्या आणि शब्दामधून मांडण्यात येणाऱ्या भावनांच्या ज्या खेळ्या मांडल्या गेल्या त्यात श्रीमान संत ज्ञानेश्वरांच्या खेळ्या अप्रतिम आहेत. शब्दांची रचना, भावनांची रचना; त्यासाठी वापरायच्या चपखल आणि जिव्हारी जाऊन बसणाऱ्या प्रतिमा आणि प्रतीकं याबाबतीत ज्ञानेश्वर माउलीला तोड नाही....शब्दांच्या, भावनांच्या, प्रतिमांच्या, प्रतीकांच्या बाबतीत आधुनिक काळात श्याम पेठकर माउलीची उंची गाठू पाहतात, असं मला वाटतं.''...."ऋतुस्पर्श'च्या प्रकाशन सोहळ्यातील राजन खान यांचे हे वाक्य मला अजूनही विसरता येत नाही. अलीकडच्या काळात एखाद्या साहित्यकृतीची तुलना करताना एवढं दिलदार आणि दिलखुलास होणं भल्याभल्यांना जमलेलं नाही. राजन खान हे नाव अपरिचित नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकानं ही दिलेरी दाखविली तेव्हा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित होते. "मौनराग'मधून स्वतःचे आस्वादक आयुष्य ताकदीने मांडणाऱ्या एलकुंचवारांच्या साक्षीनं त्यांनी श्याम पेठकरांना ही पावती दिली. मुख्य म्हणजे, राजन खान यांनी हे भाषण मुद्दाम लिहून आणलं होतं. मी असं बोललोच नाही, अशी म्हणण्याची वेळ येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली होती.
"श्याम निसर्गावर अतिशय प्रेम करणारा लेखक आहे. इंग्रजी साहित्यात वर्डस्वर्थच्या साहित्यकृतीतून ही झलक दिसते. वर्डस्वर्थने जसं निसर्गावर भरभरून प्रेम केलं, तसंच श्यामनंही भरभरून लिहिलं आहे. श्यामनं जे लिहिलं त्यातून मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला'', या शब्दांत कौतुकाची थाप दिली आहे, महेश एलकुंचवार यांनी. प्रकाशन सोहळ्यात दोन दिग्गज "ऋतुस्पर्श" वर एवढं भरभरून बोलले. त्यामुळे त्यात नक्की काय आहे, यविषयी अनेकांची उत्सुकता शिगेला पोचली होती.
"ऋतूवेगळ्या माणसांच्या सहवासानं ऋतूंनाही दंभ चढतो. दंभांचा पसारा वाढत गेला की ऋतू उर्मट होतात. हळव्या जीवांच्या कोवळ्या स्वप्नांची त्यांना काळजी वाटत नाही. फुलावर सावली धरत कळ्यांची चिंता करण्याचंही ते मग नाकारतात. पाऊस थोडा उर्मट झाला की, नद्या बिनदिक्कत गावात शिरतात. पिकानं डवरलेलं रान वाहून नेतात. रडणारे डोळेदेखील अशा पावसात वाहून जातात....'' हे आहे "ऋतुस्पर्श"मधून व्यक्त झालेलं लेखकाचं मन.
"ऋतुस्पर्श'मधून फक्त निसर्गच व्यक्त झालाय असं नव्हे. त्यात आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे संदर्भही जिवंत होऊन नजरेपुढे येतात. यात बावरलेली गोरेटली सासुरवाशीण आहे, कावळ्यांची कावेबाज कावकाव आहे, कुस्त्यांचा फड आहे, दुलईतला मालकंस आहे, पहाटेचा काकडा आहे, पाटलाचा वाडा आहे... आणखीही बरंच काही. तेही अत्यंत दमदार. त्यात आगळी नजाकत आहे. एकतर या ललितबंधातील शब्द न शब्द सकस आहे. भाषा विलक्षण प्रभावी आहे, कारण ती प्रवाही आहे. भाषेचं वैभव काय असतं असं कुणी विचारलं तर "ऋतुस्पर्श'चा दाखला डोळे झाकून देता येईल. "ऋतुस्पर्श'मधील लिखाण डोळे मिटून निसर्ग आठवायला भाग पाडतं. आपणही याच निसर्गाच्या सोबतीनं वाढलो. आपल्याला ही नजर का लाभली नाही, याची कुठेतरी खंत वाटून जाते. निसर्गाच्या या खाणाखुणा अजूनही सभोवताल पसरल्या आहेत याची जाणीव होते. आणि पुस्तक वाचून होते तेव्हा जगाकडे पाहण्याची सहजसोपी परंतु अचाट दृष्टी लाभलेली असते. वि. स. खांडेकर, दुर्गा भागवत, शांता शेळके, ग्रेस, एलकुंचवार यांच्यासारख्या ज्येष्ठांनी या प्रकारच्या साहित्याचे दालन समृद्ध करून टाकले आहे. अशा अनेक इतर लेखकांनाही ऋतूंनी भूल पाडली आहे. "ऋतुस्पर्श' या ललितबंधात डोकावताना दुर्गाताईंच्या "ऋतुपर्वा'ची आठवण हमखास येते. त्यांनी ज्या पद्धतीने ऋतूंचा पट उलगडला आहे, तीच किंवा त्या शैलीच्या जवळ जाणारी धाटणी "ऋतुस्पर्श'मधून गवसते. या पुस्तकाचा एकूणच बाज प्रेमात पाडणारा आहे. विवक रानडे हा अफलातून माणूस आहे. श्याम पेठकरांचे निसर्गावरील ललितबंध विवेक रानडे यांच्या मुखपृष्ठामुळे अधिकच उत्कट झालेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. "ऋतुस्पर्श'ची मांडणी केवळ सुबक, देखणीच नव्हे तर हृदयस्पर्शी झाली आहे.
खरेतर, आजकाल ऋतू केव्हा येतात आणि जातात हेच समजेनासे झाले आहे. आधी लालबुंद पळस बहरला की ऋतूबदलाची जाणीव व्हायची. आता शिव्यांची लाखोली ऐकू आली की शिमगा आल्याचे कळते. रखरखीत उन्हाची फिकीर न करता चालणारी पावले सावली दिसली की आपसुक थबकायची. तो गारवा अंतर्मनात झिरपायचा. आजकाल मजल्यांच्या वाढत्या उंचीने सावली खरेदी करणारे नवे दूत निर्माण करून टाकले आहेत. "जमाना बदललाय', ही हाकाटी तशी नवी नाही. गर्दीच्या आणि गदारोळांच्या कायम वास्तव्याला अनेकांची मने सरावली आहेत. अशांच्या मनात गहिवरांचा दुष्काळ वाढतो आहे. अशावेळी निसर्गातील सात्विकता शोधली पाहिजे. पहाटे उठून दवबिंदू टिपले पाहिजेत. त्यासाठी वेळ काढावा लागतो. हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरवली आहे. वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे. यातील ऋतूबदलांची ताकद माणसांना बदलवायला लावेल. सुकलेले माळरान बघून हिरमुसलेल्या जीवांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. यातील जांभळ्या मैनांशी हितगूज करावी, दवभरला दिवस अनुभवावा. थिजत जाणारे तळे काय असते हे समजून घ्यावे. रंगधून पारखावी, पाखरांची पावले शोधावी. निसर्गाशी एकजीवत्व साधणारी लेखकाची हातोटी तृप्त करून टाकणारी आहे.
अनेक मोठ्या लेखकांना बेदखल करून टाकण्याची परंपरा अलीकडे उदयास आली असे नाही. ती जुनीच आहे. नको तो ताळेबंद जपणाऱ्यांचा गोतावळा अनेक ठिकाणी आढळतो. अशांनी आधी "ऋतुस्पर्श' वाचावे. "मौसम केसाथ साथ बदल जाना चाहिये...' असे अब्बास दाना बडौदी म्हणतात. ते अनेकांना कळविण्याची गरज आहे. स्वतःचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊन आयुष्यभर तंडत राहणाऱ्यांनी तर "ऋतुस्पर्श' वाचलेच पाहिजे. अस्तित्व विसरून ओथंबून येण्यातही वेगळा आनंद असतो की नाही?
-श्रीपाद अपराजित
Wednesday, June 20, 2007
पहिला पाऊस
पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. नवनिर्मितीचं हे बीज कुठेही असू शकतं. कसंही ते येऊ शकतं. डोळ्यांतल्या स्वप्नांची लिपी वाचण्याची कला जन्मजात अवगत असणार्र्या पाखरांच्या अस्तीत्त्वाशीच हे बीज सलगी करून असतं. पहिला पाऊस नेमकं ते हुडकून काढतो. परागंदा झालेल्या वासरांनी वाळीत टाकलेल्या गावातल्या वाड्याच्या कौलारू छतावरही मग पिंपळ साकारतो. कौलारू घरांच्या छतावर हिरवळ दाटून येते. हे निर्मितीचं बिज कुठेही असू शकतं. तुमच्या-आमच्या हृदयातही. म्हणूनच सहनशक्तीची परिक्षा घेऊन आलेला पहिला पाऊस पाऊसबावर्र्या मनात कविता जागवितो. नांगरलेल्या शेतातील तासांमधून हा पाऊस पळत सुटतो.
जीवनात अनेक पावसाळे पाहणार्र्या जख्ख जीवांना देखील पहिला पाऊस भेटतोच असे नाही. अवघा पावसाळा डोक्यावर घेत मोकळ्या आकाशाखाली फीरत राहिलं, तरी पहिला पाऊस भेटत नाही. हा पाऊस हटखोर असतो. पावसाचे थेंब ओंजळीत तोलून त्याचे मोती करता आले, तरच हा भेटतो. डोळ्यांत ढग साठवण्याचे कसब ज्याला साधले त्यालाच हा पाऊस भेटतो. मग तो कधीकधी पावसाळा सरतांनाही भेटतो. चिंबचिंब भिजून रिमझिमत राहण्याची शपथ तो देऊन जातो. एखाद्या गंगापूत्रालाही तो समरांगणी शरपंजरी पडला असतांना भेटतो. कुणाला भेटायचंच असेल तर तो ग्रीष्माच्या परसात घुसखोरी करूनही भेटतो. ज्याची नाळ मातीतच गाडली आहे, असे जीव अस्तीत्त्व नांगरून बसतात. ओसाड आभाळाकडे बघत त्यांच्या डोळ्यांमध्ये ग्रीष्म दाटून येतो. डोळे मीटताच मग पावसाच्या आठवणींचे तप्त कढ पापण्यांच्या कनातीतून बाहेर पडतात. अश्या हळव्या वेळी हा पाऊस अनवाणी पायांनी शेत तूडवीत ते कढ झेलून घेतो. असा पाऊस मग आभाळभर होतो. बांधावरच्या बूंध्याला टेकून पावसाची वाट पाहणार्र्याच्या आसूसल्या चेहर्र्याला पावसाचे थेंब कुरवाळतात. शेतामध्ये मग गोरा कुंभार नाचू लागतो. जमीन दाणे मागू लागते. अर्थात हे मागणं भरभरून देण्यासाठी असतं. घरट्यांवर पंख अंथरून पाखरं अंगाई गातात. मातीशी नातं असणार्र्यांची मग धावपळ सुरू होते. बैलांच्या पावलांनी जमीन लेकूरवाळी होते. चंद्रमौळी झोपडीचं छतही मग गोवर्धन होतं. पावसाच्या सार्र्या व्यथा छत झेलून घेतं. अशा पावसाला नाविन्याचा ध्यास असतो. पाऊस मग झोपडीच्या छतातून आत शिरतो. दुधपितं लेकरू आईजवळ सरकतं आणि गोठ्यातल्या गाईच्या निळ्या डोळ्यांत हिरवं रान उगवतं.
हा पहिला पाऊस ओसरला की, कुपावर कारल्याचा वेल काट्यांशी बोलू लागतो. रान गारगार होतं. वारा चिंबचिंब होतो. अंगावरची धूळ झटकून झाडं, पहिल्या रात्रीनंतर नुकत्याच न्हालेल्या नवपरिणीत वधूसारखी संपृक्त टवटवीत दिसतात. कौलारू छतंही आरशासारखी चकचकीत होतात. पहिला पाऊस असा धूळ झटक़णारा असतो. शरीरावरची आणि मनावरची देखील.
पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पहिला पाऊस गावात येण्याआधी गावाने सुकी लाकडे जमवून ठेवावी. ऐन पावसाळ्यात गावात कुणी मेलेच, तर अडचण नको. मरणाचे स्मरण असे नेणिवेच्या पातळीवर असतेच. वाढत्या वयाबरोबर हे धूके अधीक गडद होऊ लागते. मरणाशी नजरभेट झाली, की डोळ्यांना कोवळे अंकूर फूटत नाहीत. पाऊस नेहमीचाच अनुभवायचा असेल, तर जिवंत माणसांनी जातिवंत डोळे हिरव्या पानांआड दडवून ठेवावे. नाहितर मग पाऊस जाणिवेच्या पातळीवर येतच नाही. पेशींनी अंकूरण्याचे नाकारले की, जीवांना पावसाची धुंदी चढत नाही. अश्यंना पहिला पाऊस भेटूच शकत नाही. जाणिवा जीवंत ठेवल्या की, पाऊस पहिला होवून भेटतो. हा पाऊस असा कधीच भेटला नव्हता. ऐन पावसात इमारतीच्या गच्चीवर ऊभे राहून तीच्या केसात फुलं माळतांना सुद्धा पहिला पाऊस भेटला नव्हता. पाऊस कळायला लागण्यासाठी त्याची ओळख असावी लागते. ती करून घ्यावी लागते. पावसाचेही संस्कार करावे लागतात.
साडेतीन वर्षाची चीमुरडी. यंदा पाऊस कधी येणार?, हा प्रश्न घेऊन भिरभिरत होती. वार्र्याला सदाफूलीची ओंजळभर फुलं देऊन तीने त्यालाही प्रश्न विचारला होता. कोरडा वारा मुकपणे तीच्या बटांमध्ये बोटं फिरवून निघून गेला. प्रश्न कायम होता आणि ढगांकडेही उत्तर नव्हते. शापित गंधर्वाने आपल्या सखीसाठी मेघाला दिलेला निरोपही ईतका आर्त नसावा. पाऊस न अनुभवलेली चिमुरडी पावसाची वार्ता विचारत होती. तिला ईवल्याश्या मुठीत पाऊस साठवून ठेवायचा होता. अखेर तीच्या डोळ्यांच्या कडांवर हा प्रश्न सुकून गेला. गोबर्र्या गालांवर सुकलेल्या पाण्याची नक्षी तरारली, पण पाऊस आलाच नाही. घराच्या परसदारी, तूळशीपाशी, हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून ती बसून राहिली आणि वार्र्यालाही कळू न देता तो आला. एका टपोर्या थेंबाने कळूच तीच्या डोक्यावर टपली मारली. काय आहे? मग पाण्याच्या थेंबांची गर्दीच झाली. अंगणात एकेक थेंब जमिनित रूतून बसला. अगदी इतर वेळी तिने ते थेंब रांगोळी काढण्यासाठीच वापरले असते. थेंबांनी तीला गोंजारायला सुरूवात केली अन ती आनंदाने चित्कारली - "पाऊस आला!" तान्ह्या पावसात चिमुकलीसोबत भिजतांना अचानक जाणवलं, हा पहिला पाऊस आहे. पाऊसधारांनी बावरलेली ती, तिने इवल्याश्या हातांनी गळ्याभोवती गच्च मिठी मारली. कमरेभोवती पायांचा वेढा घातला अन पाऊसच कडेवर आल्यागत वाटले.
पहिला पाऊस असा अचानक भेटतो. साधना असावी लागते. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो. कधी तीला पाऊस भेटतो, तर कधी त्याला. दोघांनाही एकाच वेळी पाऊस भेटणं हा दैवदुर्लभ योग आहे. तिच्या मोकळ्या केसांमधून ओघळणारे पावसाचे मोती तो ओंजळीत वेचतो, तेव्हा पाऊस पहिटकर असतो. तिच्या केसांच्या सरी मग जीवन क्यापून टाकतात. पाऊस मग सरी विंचरून वेणी घालतो. हवंहवंसं बंधन घालणार्र्या शृंखलाच होतात तीच्या बटा. ते बंधन असलं तरी रेशमी असतं. आकाशी असतं. पाऊस असा भेटण्याचा तो एकच क्षण असतो. त्यानंतर त्याने तिचे केस पिळून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस येइल, पण तो पहिला नसेल.
पहिला पाऊस भेटतो रानात. मनात. आईच्या स्तनात. पहिला पाऊस मनाच्या चोरकप्प्यात दबा धरून बसलेला असतो. तो भेटण्यासाठी पावसाळाच असावा लागतो, असे नाही. रणरणत्या दुपारी दुसर्र्याचं उजागर सौभाग्य झालेली त्याची 'ती' त्याला भेटते, तेव्हा मनात दबा धरून बसलेला पहिला पाऊस अचानक कोसळू लागतो. अशा वेळी सावरणं कठीण असतं. पाऊस धरवत नाही आणि चिंब होता येत नाही, अशी केविलवाणी अवस्था असते. घरासमोरील अंगणात शेवंतीचं रोपटं लावतांना पाऊस हातातून वाट काढतो. ओणवं होऊन शेतात कापूस वेचतांना हाच पाऊस पाठीवर स्वार होतो. एखाद्या अंधार्र्या रात्री वारा खिडकीच्या तावदानांना धडका देत असतो आणि घरात आईचा निष्प्राण देह पडला असतो. त्या काजळ्या रात्रीही पहिला पाऊस कुंपणापाशी खिन्न बसला असतो. या पहिल्या पावसाची फुलं होतात. ती माळून ठेवता यायला हवीत.
Friday, June 8, 2007
शिशिराचे चाळे
उन्हाला वसंताची चाहूल लागत असतांना शिशिर पानापानांमधून गळतीला लागला असतो. पानांचे पानपण सांभाळतांना वार्र्याचीही दमछाक होत असते. मग वार्र्याची वावटळ होते. गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडायला लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात. पाणी केव्हा तोडायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. खरंतर ज्यांना पिकवावं लागतं त्यांना शिकवावं लागत नाही.
हवा हळूवार कोरडी होते आणि पहाटेचं धूकं संकोच करू लागतं. पहाट अशी संकोचली, की गव्हाच्या ओंब्या दमदार दाण्यांनी ओथंबतात. गव्हाच्या रानातले बगळे गारवा सरत असतांना दूर रानात तळ्याच्या काठी समाधी लावायला निघून जातात. पाचोळा उडवीत वावटळ भर दुपारची गावात शिरते. गावतले सुगीचे सारेच संदर्भ आता संपलेले. सुगीचा हिशेबही आता जूना झालेला. घेण्यापेक्षा देण्याच्याच भावाने गाव पार वाकून गेलेलं. असा येण्या-जाण्याचा हिशेब गावाला ठेवता येत नाही. गावाचं घेणं तसं देण्यासाठीच असतं. संचीत सरलं तरी देणं मात्र बाकिच असतं. गावाची अशी वजाबाकी सुरु असतांना ऋतूचीत्र पालटून जातं.
गावात अशी वजाबाकी सुरु असतांना शिशिराला म्हातारचळ सुचलेलं. ऋतूंचे म्हातारचाळे तसे देखणे असतात, पण मनाच्या तळाशी एक एक विषण्ण शांतता पसरविणारे असतात. झाडांकडे आता गाळायलाही पानं नसतात. झाडं बेटी भलतीच करंटी वाटू लागतात. पण ऋतूंनी दिलेल्या करंटेपणातूनच वसंत फुलत असतो. गळून पडायला काहिच उरलं नाही, की मगच नवी पालवी फुटत असते. गमवायला काही शिल्लक नसलेलाच कमवू शकतो. शिशिर सरत असतांना झाडं फुलांनी पानांना भागत असतात. अशा दिवसातली दुपार तशी केविलवाणी असते. गावाचे शेतंही ओकीबोकी झालेली. पौषातल्या अश्या एखाद्या दुपारी पाखरं अचानक गावाकडे पाठ फिरवतात. सुगी सरली की, गावाकडे पाठ फिरवण्याची शिकवण पाखरांना पंख पसरण्याआधीच देण्यात येते. एखादी एकट टिटवी निसवलेल्या रानात मनातली हिरवळ डोळ्यात आणून सुगीचे संदर्भ टिपत असते. अशावेळी गावाला दुपारची झोप येत नाही. पण संपन्न सुस्तावलेपणाचा आव आणून गाव डोळे मिटून गप्पगार पहुडलेलं असतं. कडुनिंबाचे अखेरची काही पानं वार्र्याला दोष देत उगाच भिरभिरत जमिनिवर कोसळत असतात. पानांचा जीव जमिनीवर अंथरून झाडं अशी निष्पर्ण उभी असताना, भर दुपारी गावातल्या न्हात्या-धूत्या झालेल्या मुली कडुनिंबाच्या पारावर अंघोळ करीत बसतात. टिक्करबिल्ला खेळायच्या खापरानं त्या अंग घासत असतांना कडुनिंबाची नजर डोळ्यांसकट त्यांच्या वक्षावर गळून पडते. मुलींचा टिक्करबिल्ला केव्हाच सरलेला. पण खेळतांना बांधलेली रेघोट्यांची घरं मात्र डोळ्यांच्या पापणकाठावर सजीव झालेली. मुलींचं असं खेळण्या-बागडण्याचं वय शिशिराच्या अशा दुपारीच का सरतं, ते कळत नाही. अंगी वसंत फुलत असतांना शैशवाची कोवळी पानं अशी झडून गेलेली असतात.
गावाने पानगळ अशी आंगोपांगी गोंदवून घेवू नये. पानगळीची पुरेशी नोंद घेउन ती विसरायची असते. संदर्भासह जपुउन ठेवावे असे शिशिरात काहीच घडत नाही. वसंत तिच्या केसांत माळायचा नसतो, तसा शिशिरही डोळ्यांत भरायचा नसतो. तिन्ही ऋतू त्यांच्या संचीतासह क्षितिजावर पसरलेले असतात. पानगळही अशी हळूच मनात घर करते. झाडांचा धीर सुटला की पानगळ सुरु होते. ऋतूंचे असे गहिवर वहीच्या पानात जपून ठेवले की वहीची ती पानं केव्हाही छळतात. नको त्या वेळी वहीची पानं फडफडतात अन ऐन वसंतातही शिशिराचे चाळे सुरु होतात. हळद-कुंकू सांडवून पौषवारे वाळल्या पानांच्या ढिगामध्ये हरवून जातात. गारठवून टाकणारे वेडे वारे घेऊन माघ येतो. कापर्र्या वार्र्यांनी झाड६ चळाचळा कापतात. पांघरायला पानंही नसतात. हिरवेपण अनावर झालं की असं होणारच. मतलबी शुभ्र झळाळी घेऊन बगळे मग वृक्षांना सलाम ठोकतात. पानांच्या आठवणीत उसासे टाकणार्र्या झाडांच्या कोरड्या फांद्यांवर कावळ्यांची घरटी करपलेल्या वारकर्र्यांच्या कपाळी लावलेल्या बुक्क्यागत दिसतात. माघातले वारे कावळ्यांच्या घरट्यांशी छेडखानी करतात. ऋतू असे बेइमान झाले की गावाशी ईमान बाळगून असणारी ती काळी पाखरं बेभान होतात. वार्र्यावर चोचींनी प्रहार करण्याचा वेडेपणा करतात. कावळ्याची अस्वस्थ कावकाव या दिवसांत दुपार करपवून टाकते. दुपारच्या वामकुक्षीनंतर लगबगीनं दुकानाकडे जाणारा नामदेव शिंपी हातांचे वल्हे करून स्वतःच्याच डोक्यावरून फिरवीत जातो. माणसांच्या करंटेपणानेच गावावर पानगळ आली, हा त्या काळ्या पाखरांचा समज गावाच्या तीन पिढ्यांना काढता आलेला नाही. त्यांची घरटी असलेल्या निष्पर्ण झाडाखालून जाताना भागाबुढीचा डोळा कावळ्यांनी फोडल्याची कथा मात्र गाव वर्षानुवर्षे नव्या पिढीला सरत्या शिशिरात सांगत असते. भागाबुढी याच गावात नक्की रहायची का, ते कुणीच विचारत नाही. शिशिर चाळ्यांनी कावळे चीडले असतांना असले प्रश्न गावाला पडत नाही. कोळपलेल्या गढीच्या बुरुजावर अनाहूत वाढलेल्या कलत्या पिंपळावर बसून एका डोळ्याची कावळी मात्र बुबूळ गरगरा फिरवीत उजाडलेल्या गावाकडे बघत खंतावत असते. काटक्या झालेल्या झाडांवरील घरात वसंताचा गळा वाढवणार्र्या पाखरांनी शिशिराच्या चाळ्याची खंत करायची नसते. आपल्याच घरट्यात वसंत वाढतोय, हे पाखरांना कळू नये, हे पाखरंच प्राक्तन असतं. सुगी आटोपली की नदीचं पाणी आटण्याआधी घराची डागडुजी करून घ्यायची असते. मग माणसंही कामाला लागतात. गावच्या गढीची माती दुपारच्या एकान्तात चोरून नेतात. गावचा पाटिल म्हणे तालेवार होता. वाटण्या झाल्या तेव्हा तराजूने तोलून सोने वारसदारांमध्ये विभागले होते. गढीच्या खचलेल्या जाडजूड भिंतींमध्ये म्हणे सोन्याच्या लगडी लपवून ठेवल्या होत्या. पानगळीतल्या भयाण रात्री कुणीतरी एकटाच अंधारालाही ओळख न देता गढी खोदून सोन्याचा शोध घेतो. सुखाच्या शोधाचे असे कितीतरी खड्डे गढीभर पसरलेले आहेत. गढी आता पानं गाळून बसलेल्या झाडांसारखीच उजाड झालेली आहे.
पाटलाच्या गढीत वसंत कधी येणार, हा प्रश्न पाखरांनाही पडलेला. पाखरांच्या असंख्य पिढ्यांनी पाटलाच्या रंगमहालात उत्कट रसिकतेची मादक दरवळ बघीतली आहे. नशिबाची पानगळ आली आणि केवळ रसिकताच उरली. व्यक्त होण्यासाठी संपन्नता लागते. उपभोगाचे भोग मग पाटलाला छळू लागले. माघातल्या ओरबाडून टाकणार्र्या वार्र्यात शरीरही पिंजून निघालेले. मग रसिकता उपभोगाची दासी झाली. जीवनातले गुलजार वसंत छळतात अश्यावेळी! म्हातारा पाटिल वसंताच्या आठवणींनी बेभान व्हायचा. मग गावातल्या गरत्या घरच्या घरंदाज गृहिणींच्या पायातही चाळ बांधायला म्हातारा पाटिल धावू लागला. गावाच्या चीरेबंदीपणाला असे तडे जाऊ लागले. पाटलाच्या तालेवारपणाखाली वाकलेले गाव एक दिवस ताठ झाले. श्रीमंतीच्या आठवणीत खंगलेल्या पिढीनंही म्हातार्र्याविरुद्ध बंड केले. म्हातारा पाटिल आता गढीवरच्या वाड्यातल्या वरच्या खोलीत बंदिस्त. पानगळीने हैराण झालेल्या भणभणत्या माध्यान्हीला वेड्या पाटलाच्या डोळ्यांत वसंत नाचू लागतो. भोगलेल्या स्त्रीयांच्या नावाने पाटलाची कावकाव सुरु होते. वसंतसेनेच्या अनावृत्त अवयवांच्या रसभरीत वर्णनांनी पाटलांची बेताल बडबडही तालबद्ध होते.
शिशिराची पानगळ झेलत वसंत तेव्हा गावतळ्याकाठी निवांत बसलेला असतो. शिशिराचा प्रवेश संपला, की त्यालाच रंगमंचावर यायचे असते. असे प्रवेश ऋतूंना चुकूनही चुकवता येत नाहीत.
Subscribe to:
Posts (Atom)

