Saturday, May 5, 2007

मोगरेपणाच्या गोष्टी

गावांपासून बिछडल्यावर 'राशनकी कतारोंमें' दिसण्याच्या व्यथा बऱ्याच जुन्या. किमान औद्योगिक क्रांतीएवढ्या तरी. आता अख्ख्या जगाचं ग्लोबल खेडं बनताना या व्यथा अधिक तीव्र बनताहेत. या व्यथांमध्ये नात्यांंमधला ओलावा आटल्याची वेदना सर्वात मोठी. तरल मनांना त्याहीपेक्षा हळवी करते ती निसर्गापासून दुरावल्याची खंत. शहरीकरण वाढत चाललंय. बागांमध्येही हिरवळीच्या ऐवजी काँक्रिटी जॉगिंग ट्रॅक बनताहेत. पिंडाला शिवण्यासाठी कावळेही मिळत नाहीत. त्यातून शहरी बनण्याची खंत एकट्यादुकट्याची न राहता हळूहळू सार्वत्रिक होत चालली आहे.

या सार्वत्रिक खंतावण्याचं द्योतक म्हणून पेपरांमधल्या हवामानविषयक बातम्यांकडे बघता येईल. पेपरात निसर्गातल्या बदलांची दखल मोठ्या प्रमाणात घेतली जातेय. थोडी रिमझिम झाली... ऊन मी म्हणतंय... वारं झोंबू लागलंय... या बातम्यांना पहिल्या पानावर ठळक जागा मिळतेय. 'आज शहर में मौसमकी पहली बरसात हुई', असे लाइव्ह चॅट टीव्ही चॅनलवर सहज दिसतात. आताआतापर्यंत वातावरणातले बदल म्हणजे नेहमीचे ऋतू आता हॅपनिंग बनलेत. मग या ऋतूंवर अग्रलेख लिहिले गेले, तर कुठे बिघडलं?


'तरुण भारता'त श्याम पेठकरांनी लिहिलेल्या साप्ताहिक अग्रलेखांचं 'ऋतुस्पर्श'हे पुस्तक आलंय. यातल्या ललित लेखांचा विषय आहे, बदलणारा निसर्ग. पहिला लेख वसंताची चाहूल घेऊन येतो. मग पाठोपाठ प्रत्येक आठवड्याला निसर्गात होणारे बदल टिपत. त्यावर भाष्य करत, कुठे अध्यात्माची डूब देत, श्यामभाऊ वर्षभराच्या ऋतुंची रपेट घडवून आणतात. विषय तसा नवा नाही. अनेक दिग्गजांनी यावर लिहिलंय. पण जो तरल, हळवा आणि जिवंत अनुभव 'ऋतुस्पर्श' देतो, त्याला जवाब नाही.


या कविताच. गद्यात लिहिलेत म्हणूनच लेख म्हणायचे. पुस्तकाचं नाव, मांडणी, मुखपृष्ठ सगळंच कवितासंग्रहाला साजेसं. 'भिजपाऊस', 'पाऊसवेणा', 'भादव्यातले दिवस', 'चंदसुगीचे दिवस', 'शिशिराचे चाळे' ही काही लेखांची नावंसुद्धा लेखांची काव्यत्मता अधोरेखित करतात. रुढार्थाने कविता नसूनही हे लेख कविता वाचण्याचा आनंद आणि समाधान देतात. एक समृद्ध करणारा अनुभव देतात. उदाहरणादाखल 'मोगरा' या लेखातला उतारा. '... धरेच्या अधरातील पाणीच तेज शोषून घेतं. समागमाआधीचं उन्मुक्त तहानलेपण घेऊन माती सैरभैर होते. तापलेला वारा उगाच तिच्याशी खेळ मांडतो. वाऱ्याच्या अशा दांडगट विनयभंगानं वातावरण उसवत जातं. अस्तित्व पिसाट होतं... सारं सारं चिरडून टाकण्याच्या अवस्थेत फुलांनी कसं फुलावं? फुलांकडे आर्त सुगंध असतो. हळवे रंग असतात. पण तापट अन्यायाला करडा विरोध करण्याचं धैर्य नसते. अशा जाळून टाकणाऱ्या, तहानलेल्या वातावरणात मोगरा मात्र धैर्याने फुलतो. मिलनाच्या आतुरतेचं अत्यंत मोहक, सुगंधी रूप म्हणजे मोगरा.' मोगऱ्याच्या या वृत्तीला लेखकाने वापरलेला शब्द खूप छान आहे, मोगरेपणा.

जगभरच्या माहितीचा स्फोट आपल्या कवेत घेण्यासाठी धावधाव धावणाऱ्यांना 'ऋतुस्पर्श' आपल्या आत डोकावायला भाग पडतं. रोजच्या रोज निसर्गात एवढं काही घडतं आणि ते इतकं सुंदर आहे. त्या सौंदर्याची झुळूकही आपल्यापर्यंत येत नाही, एवढे आपण करंटे बनलो आहोत का, असा सवाल उभा राहतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे शाळेत शिकलेले तीन ऋतूच आपल्याला कसेबसे माहित असतात. निसर्गातल्या नवनव्या रूपांची दखल घेणाऱ्या सहा ऋतुंची नावंही आठवत नाहीत. अशावेळेस 'ऋतुस्पर्श' जादूच्या पेटाऱ्यातून काढाव्यात तशा एकेक गोष्टी सांगत आपल्याला चाट पाडतं. याविषयी राजन खान यांची नोंद आहे, 'निसर्ग, भाषा आणि माणूस यांचा घोळमेळ या पुस्तकात शब्दातीत एकजीव झाला आहे.'

पेठकरांनी तरल विरुद्ध कोरडेपणातला संघर्ष यात उभा केलाय. स्वत:च्या तरलतेवर शहरी कोरडेपणाचा हल्ला लेखकाला अस्वस्थ करतो आहे. त्या अस्वस्थतेची हळवी सावली पुस्तकभर जाणवत राहते आणि पुस्तकाला उंचीवर नेतेे. निसर्ग लेखकाच्या जाणीव आणि नेणीवेशी एकरूप झाला आहे. पण आता त्यांच्या काडीमोडाचा प्रवास सुरू झाला आहे. त्यातून लेखक निसर्गाच्या आणखी जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी धडपडतो आहे. ही धडपड प्रेमात पाडणारी आहे.

' ऋतुस्पर्श'ची भाषा निसर्गात डुंबणारी आहे. शिवाय त्याला विदर्भाच्या मातीचा वासही आहे. पण त्यातला शब्दांचा फुलोरा कधीमधी खटकतोही नक्की. शिवाय सोपेपणाच्या नावाखाली भाषेच्या सपाटीकरणाच्या जमान्यात यातली भाषा थोडी जडही वाटू शकते. श्रीमंतीचं प्रदर्शन म्हणून दागिने सुंदर दिसतातच असे नाही. दागिने मिरवण्यासाठी सौंदर्यांत वेगळी नजाकत आणि दिमाख असावा लागतो. 'ऋतुस्पर्श' मध्ये उपमा-उत्प्रेक्षांचे अलंकार भरघोस लगडलेले आहेत. आनंद हाच की ते मिरवण्यासाठीची नजाकत आणि दिमाखाचं रसरशीत मिश्रण पेठकरांच्या भाषेच्या सौंदर्यात आहे.
....................................
ऋतुस्पर्श : श्याम पेठकर
विजय प्रकाशन,
पानं १५९
किंमत १५०

1 comment:

दिपक said...

नमस्कार चैतन्य,

तुमचा ब्लॉग 'ऋतुस्पर्श' खरचं सुंदर झाला आहे. निसर्ग प्रेमींसाठी खूप वाचनीय आहे.
पुढे असेच सुंदर वाचायला मिळेल ही आशा बाळगून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !