Wednesday, May 16, 2007

पानगळ.

पानगळ तशी आपसूकच आल्यासारखी येते. पानगळ आली की, झाडं उत्तरायणाची वाट बघत शरपंजरी पडलेल्या जख्ख योद्धयासारखी दिसू लागतात. निशःब्द वाटेवरून पौषातल्या झोंबर्र्या दूपारी जातांना एखादं पिकलं पान गळून अंगावर पडलं, की मृत्युला रोखून शरपंजरी पडलेल्या त्या योद्धयाची अलगद आठवण येतेच. मग सुर्याच्या चढत्या तापमानाची ही सुरूवातच डोक्यावरून मायेचं छत्र काढून घेतल्यागत उदास होते. पण आलेला ऋतू स्विकारणं, हे आपलं प्राक्तन असतं. कारण कोणताच ऋतू अपघाताने येत नाही. औपचारीकपणे तर येतच नाही. प्रत्येक ऋतू म्हणजे सृष्टीच्या संचीताचं तीच्या तिच्या झोळीत पडलेलं दान असतं. कापत जाणारी उन्हं कितीही नकोशी झाली, तरीही ती नाकारता येत नाहीत. पावसानं आयुष्याचा चीखल केला, तरीही त्याला पडू नको असं सांगणारे आपण कुणीही नसतो. डोळ्यांना रडू नका असंही सांगण्याच आपल्याला भान नसतं. आभाळानं दिलेलें कुठंलंच दान आपल्याला नाकारता येत नाही. पानगळही!
आभाळाला नको, असं सांगता येत नाही. आपण तसं सांगू शकत नाही. सांगूही नये. पानगळ म्हणूनच अनिवार्यपणे येते. गळणारी पानं तूमच्या नकाराला मोजत नाहीत. तशी गळणारी पानं आपल्यालाही मोजता येत नाहीत. फारफार तर झोपाळ्यांवर झूलण्याच्या वयात, ईतरांची नजर चुकवून एकट्या दूपारी झाडावरून सुटलेलं, वार्र्यावर भिरभिरत येणारं पान हाताच्या ओंजळीत वरचे वर पकडून वहीच्या कप्प्यात ठेवता येतं. पण उमलत्या, कोवळ्या कुंवार वयात असं करतांना आपण सावध असायला हवं. गळतीला लागलेलं गाव उमलत्या जीवांच्या इतक्या हळव्या, नाजूक क्षणांवर नजर ठेवून असतं. खरे तर प्रत्येकाच्या डोळ्यांत एक स्वप्नांची राजकुमारी असते. स्वप्नांचा राजकुमार असतो. स्वप्नांचं हे अवतरण कुणीतरी कुणासाठीतरी लिहून ठेवतो. अगदी स्वतःचं प्राक्तन समजून. प्राक्तन म्हणजे संचीताचा साठा असतो, हे विसरून आपण त्या खेळाचे खेळी होतो. मग "घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी वणवणतो पोटासाठी तो राजपुत्र अलबेला" हे वास्तव समोर येतं.
हा शिशिर तसा स्वप्नांचा ऋतू आहे. मावळत्या मस्तीची गुलाबी साय पांघरून थंडीच्या पांघरूणातून गाव वास्तवाला आकार देत निवांत निजलेले असते. बंद दारे आणि थोराड भिंतींना बोचरे वारे झोंबत असतात. गावाचे श्वासच तेवढे ऐकू येतात. अशा घाबरट शांततेत जून्या वाड्याच्या पडक्या खिंडारातून पोस्टमन हळूच सायकल बाहेर काढतो. गारगार वार्र्यानं उन्हालाही कापरं भरलेलं असतं. पिंपळपाराजवळ रात्र अंगावरून गेल्याने थिजत चाललेली शेकोटी शेवटचं धूमसत असते. तो तिच्यात प्राणपणानं फुंकर घालतो. पिंपळाची गळालेली पाने त्यात टाकतो आणि धगधगू लागतो. गाव तरंग नसलेल्या तलावासारखं शांत असतं. गावचा थीजलेला तलाव मात्र पौषवार्र्याच्या संगतीनं थरथरू लागलेला. पोस्टमन त्याच्या विटलेल्या रंगाच्या बॅगमधून धूरकट झालेल्या काचेचा चष्मा काढतो. तुटलेल्या दांडीच्या ठीकाणी बांधलेला धागा डाव्या कानात अडकवून पत्र वाचतो. तशी दुसर्र्यांची पत्र वाचू नयेत. पण सासुरवाशिणीची पत्रं पानगळीला बळी पडलेल्या पानांसारखीच. गाव अशा सासुरवाशिणींकडे दुर्लक्ष करतो. दर पानगळीच्या मोसमात गावतळं अशा एकातरी सासुरवाशिणीला आपल्या उदरात घेतं. अशा कोवळ्या पानगळीकडे कुणाचंच लक्ष नसतं म्हणून अशी पत्रं वाचतांना पोस्टमनचे डोळे थिजतात. पण गावच्या विवंचना वेगळ्या असतात.
पांढर्र्या कापसाच्या पांढर्र्या पायाच्या सुगीचा हवालदिल हिशेब करीत ऐन दुपारच्या वेळी गाव एखाद्या बेजबाबदार पोरासारखं शांत निजलं असतं. स्वप्नांची राजकुमारी वाड्याच्या परसात खरकटी भांडी घासायला काढते. अशावेळी एकाएकी एक वार्र्याची जोरदार लकेर येते आणि शेवग्याच्या झाडांवरून तुरीच्या डाळीच्या आकाराएवढ्या पिवळ्या पानांचा एक पदर बाहेर येतो. सर्वांचा डोळा चूकवून पानगळ अशी गावात आणि गावाबाहेरही येते.
पानगळ गावात येते तेव्हा गाव उघडं बोडखं दिसू लागतं. बाप मेलेल्या मुलासारखी, जंगलात झाडांना सवयच असते बिनभरवश्याच्या मोसमांची. नेमकी याचवेळी निवडूंगाला फूलं येतात. निवडुंगाच्या काटेदार पानांचं हिरवेपण डोळ्यांत खुपू नये म्हणून शिशिरातले शहाणे वारे, कडुनिंबाच्या पानांची बेसरबिंदी निवडुंगाच्या काट्यावर अलगद टोचून देतात. कडुनिंबाची पानं पानगळीच्या मोसमात श्रावणातल्या झडीसारखी नित्यनेमानं बरसत असतात. अंगणात टिक्करबिल्ला खेळणार्र्या परकरातल्या पोरी, कडुनिंबाची इवली इवली पानं वरच्या वर हवेत झेलण्याचा खेळ करतात. दुपार टळटळीत होण्याआधी जिच्या ओच्यात जास्त पानं जमा होतील तिचा सगुण सिद्ध होतो, हे त्यांना परंपरेनं माहीत झालेलं असतं. पुढे त्याच पोरी न्हात्या-धुत्या झाल्या की याच कडुनिंबाखाली ताट्याच्या छत नसलेल्या न्हाणीघरात भर दुपारच्या अंघोळ करीत बसतात. आपल्याच नादात खाराच्या तुकड्याने पायाचे तळवे घासत उबदार पाण्याच्या मंद मंद स्वप्नात घरंगळत असतात. शिशिराची शिरशिरी मग तरूण अंगाच्या प्रत्येक काट्यावर एक एक रोप अलगद लावून टाकते.
सांजेला पांढर्र्याशुभ्र बगळ्यांची माळ सराईतपणे मारुतीच्या देवळावरून उडून जाते. पिंपळाच्या शेंड्यावर मग पांढर्र्या पानांची आरास होते. गावतल्या तरण्या पोरी याच वेळी गावमारूतीला दिवा टाकायला जातात. पिंपळावरचा कावळा उगाच डोळा मिटून घेतो. आपण समजतो वसंत आला. खरेतर आपले पानपण फांदीला भारी झाले की पानगळ ऐन भरात येते. मग आपण दगडांचे शेजारी होतो. ज्यांना स्वप्नांचे डोळे आहेत, त्यांनी ही पानगळ आपल्या श्वासांमध्ये भरून घेतली पाहिजे म्हणजे पुढे आयुष्यात काही पडझड झालीच, तर पानगळीचे हे संदर्भ काठीसारखे हातात धरून स्वतःला सावरता येते.
पुढे ते गावात आले. गावाबाहेरच्या त्या कट्ट्यावर कंबरेपर्यंत पानांचा ढीग साचेपर्यंत बसून राहिलेत. त्या ढिगातून सळसळत साप बाहेर यायचेत. बाबा तसेच बसून होते. विरक्त. वेगळे. त्यांना न्यायला त्यांच्या सासरची मंडळी आली वरात घेउन. ती वरात नदिच्या डोहात बुडली. बाबा पुढे तेथेच राहिले दुसर्र्या पानगळीपर्यंत. तोपर्यंत त्यांच्या अंगावरची पानं काळी पडली होती. म्हणून ते काली कंबलवाले बाबा. ह्या कथा प्रेमाच्या आहेत, की... एक चाफ्याचं झाड आहे. शुभ्र फुलांनी डवरलेलं. पानगळीत झाडाला नुसतीच फुलं असतात. निवडुंग आणि चाफा यांनाच फक्त पानगळीला फसवता येतं. इतर झाडं पानगळीला शरण जातात. नुसतीच शरण जात नाहित तर कह्यात जातात. हे कह्यात जाणं ईतकं पराकोटीचं असतं,की झाडे उन्मनी अवस्थेत येतात. एखाद्या बोडख्या संन्याशासारखे, कुठल्यातरी धुंदीचे गाणे गात बेभान होतात. आपल्या अ&गावरीला पानांचे एकेक वस्त्र उतरवून टाकतात. अनंग होतात. मग गाव उगीच उदास उदास वाटू लागतं. उगीच वेडावल्यासारखं वाटतं.
हे असं असलं तरी हे असं रहात नाही. मग हळूच एखाद्या पहाटे कडुलिंबाचा फुलांचा सुवास येतो. ऋतू झपकन झपताल घेउन समेवर येतो. पहाटे शेतावर जावं, तर पळसाच्या झाडावर भगव्या रंगाच्या अंगठ्याएवढ्या कूयर्र्या बाहेर आलेल्या असतात. कत्थ्या रंगाची एक लव सार्र्या सृष्टीवर पसरली असते.
आणि मग आपल्या लक्षात येतं की, आपल्या कह्यात आलेल्या सृष्टीला या पानगळीने हिरव्या स्वप्नांचे डोळे दिले आहेत. इतक्यात कुठून तरी एक कोकीळ स्वर येतो आणि सारेच वास्तवातल्या स्वप्नांत गाऊ लागतात. "आला वसंत आला वसंत, आला वसंत आला " खेळीयाचा एक खेळ संपलेला असतो. पानगळीचं हे बाळंतपण किती कठीण असतं नाही?

1 comment:

कोहम said...

Chaitanya.....mitra bolayla shabda nahiyet....apratim lihilays tu.....asach lihit raha.....apan tuzya blog che fan zalo bagh....kadachit responses comments kami miltil...pan tyane nirash hou nako.....haluhalu mazyasarakhe pankhe bhovati firayala lagtil.....