Sunday, May 20, 2007

शिशिराचे चाळे

उन्हाला वसंताची चाहूल लागत असतांना शिशिर पानापानांमधून गळतीला लागला असतो. पानांचे पानपण सांभाळतांना वार्र्याचीही दमछाक होत असते. मग वार्र्याची वावटळ होते. गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडायला लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात. पाणी केव्हा तोडायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. खरंतर ज्यांना पिकवावं लागतं त्यांना शिकवावं लागत नाही.
हवा हळूवार कोरडी होते आणि पहाटेचं धूकं संकोच करू लागतं. पहाट अशी संकोचली, की गव्हाच्या ओंब्या दमदार दाण्यांनी ओथंबतात. गव्हाच्या रानातले बगळे गारवा सरत असतांना दूर रानात तळ्याच्या काठी समाधी लावायला निघून जातात. पाचोळा उडवीत वावटळ भर दुपारची गावात शिरते. गावतले सुगीचे सारेच संदर्भ आता संपलेले. सुगीचा हिशेबही आता जूना झालेला. घेण्यापेक्षा देण्याच्याच भावाने गाव पार वाकून गेलेलं. असा येण्या-जाण्याचा हिशेब गावाला ठेवता येत नाही. गावाचं घेणं तसं देण्यासाठीच असतं. संचीत सरलं तरी देणं मात्र बाकिच असतं. गावाची अशी वजाबाकी सुरु असतांना ऋतूचीत्र पालटून जातं.
गावात अशी वजाबाकी सुरु असतांना शिशिराला म्हातारचळ सुचलेलं. ऋतूंचे म्हातारचाळे तसे देखणे असतात, पण मनाच्या तळाशी एक एक विषण्ण शांतता पसरविणारे असतात. झाडांकडे आता गाळायलाही पानं नसतात. झाडं बेटी भलतीच करंटी वाटू लागतात. पण ऋतूंनी दिलेल्या करंटेपणातूनच वसंत फुलत असतो. गळून पडायला काहिच उरलं नाही, की मगच नवी पालवी फुटत असते. गमवायला काही शिल्लक नसलेलाच कमवू शकतो. शिशिर सरत असतांना झाडं फुलांनी पानांना भागत असतात. अशा दिवसातली दुपार तशी केविलवाणी असते. गावाचे शेतंही ओकीबोकी झालेली. पौषातल्या अश्या एखाद्या दुपारी पाखरं अचानक गावाकडे पाठ फिरवतात. सुगी सरली की, गावाकडे पाठ फिरवण्याची शिकवण पाखरांना पंख पसरण्याआधीच देण्यात येते. एखादी एकट टिटवी निसवलेल्या रानात मनातली हिरवळ डोळ्यात आणून सुगीचे संदर्भ टिपत असते. अशावेळी गावाला दुपारची झोप येत नाही. पण संपन्न सुस्तावलेपणाचा आव आणून गाव डोळे मिटून गप्पगार पहुडलेलं असतं. कडुनिंबाचे अखेरची काही पानं वार्र्याला दोष देत उगाच भिरभिरत जमिनिवर कोसळत असतात. पानांचा जीव जमिनीवर अंथरून झाडं अशी निष्पर्ण उभी असताना, भर दुपारी गावातल्या न्हात्या-धूत्या झालेल्या मुली कडुनिंबाच्या पारावर अंघोळ करीत बसतात. टिक्करबिल्ला खेळायच्या खापरानं त्या अंग घासत असतांना कडुनिंबाची नजर डोळ्यांसकट त्यांच्या वक्षावर गळून पडते. मुलींचा टिक्करबिल्ला केव्हाच सरलेला. पण खेळतांना बांधलेली रेघोट्यांची घरं मात्र डोळ्यांच्या पापणकाठावर सजीव झालेली. मुलींचं असं खेळण्या-बागडण्याचं वय शिशिराच्या अशा दुपारीच का सरतं, ते कळत नाही. अंगी वसंत फुलत असतांना शैशवाची कोवळी पानं अशी झडून गेलेली असतात.
गावाने पानगळ अशी आंगोपांगी गोंदवून घेवू नये. पानगळीची पुरेशी नोंद घेउन ती विसरायची असते. संदर्भासह जपुउन ठेवावे असे शिशिरात काहीच घडत नाही. वसंत तिच्या केसांत माळायचा नसतो, तसा शिशिरही डोळ्यांत भरायचा नसतो. तिन्ही ऋतू त्यांच्या संचीतासह क्षितिजावर पसरलेले असतात. पानगळही अशी हळूच मनात घर करते. झाडांचा धीर सुटला की पानगळ सुरु होते. ऋतूंचे असे गहिवर वहीच्या पानात जपून ठेवले की वहीची ती पानं केव्हाही छळतात. नको त्या वेळी वहीची पानं फडफडतात अन ऐन वसंतातही शिशिराचे चाळे सुरु होतात. हळद-कुंकू सांडवून पौषवारे वाळल्या पानांच्या ढिगामध्ये हरवून जातात. गारठवून टाकणारे वेडे वारे घेऊन माघ येतो. कापर्र्या वार्र्यांनी झाड६ चळाचळा कापतात. पांघरायला पानंही नसतात. हिरवेपण अनावर झालं की असं होणारच. मतलबी शुभ्र झळाळी घेऊन बगळे मग वृक्षांना सलाम ठोकतात. पानांच्या आठवणीत उसासे टाकणार्र्या झाडांच्या कोरड्या फांद्यांवर कावळ्यांची घरटी करपलेल्या वारकर्र्यांच्या कपाळी लावलेल्या बुक्क्यागत दिसतात. माघातले वारे कावळ्यांच्या घरट्यांशी छेडखानी करतात. ऋतू असे बेइमान झाले की गावाशी ईमान बाळगून असणारी ती काळी पाखरं बेभान होतात. वार्र्यावर चोचींनी प्रहार करण्याचा वेडेपणा करतात. कावळ्याची अस्वस्थ कावकाव या दिवसांत दुपार करपवून टाकते. दुपारच्या वामकुक्षीनंतर लगबगीनं दुकानाकडे जाणारा नामदेव शिंपी हातांचे वल्हे करून स्वतःच्याच डोक्यावरून फिरवीत जातो. माणसांच्या करंटेपणानेच गावावर पानगळ आली, हा त्या काळ्या पाखरांचा समज गावाच्या तीन पिढ्यांना काढता आलेला नाही. त्यांची घरटी असलेल्या निष्पर्ण झाडाखालून जाताना भागाबुढीचा डोळा कावळ्यांनी फोडल्याची कथा मात्र गाव वर्षानुवर्षे नव्या पिढीला सरत्या शिशिरात सांगत असते. भागाबुढी याच गावात नक्की रहायची का, ते कुणीच विचारत नाही. शिशिर चाळ्यांनी कावळे चीडले असतांना असले प्रश्न गावाला पडत नाही. कोळपलेल्या गढीच्या बुरुजावर अनाहूत वाढलेल्या कलत्या पिंपळावर बसून एका डोळ्याची कावळी मात्र बुबूळ गरगरा फिरवीत उजाडलेल्या गावाकडे बघत खंतावत असते. काटक्या झालेल्या झाडांवरील घरात वसंताचा गळा वाढवणार्र्या पाखरांनी शिशिराच्या चाळ्याची खंत करायची नसते. आपल्याच घरट्यात वसंत वाढतोय, हे पाखरांना कळू नये, हे पाखरंच प्राक्तन असतं. सुगी आटोपली की नदीचं पाणी आटण्याआधी घराची डागडुजी करून घ्यायची असते. मग माणसंही कामाला लागतात. गावच्या गढीची माती दुपारच्या एकान्तात चोरून नेतात. गावचा पाटिल म्हणे तालेवार होता. वाटण्या झाल्या तेव्हा तराजूने तोलून सोने वारसदारांमध्ये विभागले होते. गढीच्या खचलेल्या जाडजूड भिंतींमध्ये म्हणे सोन्याच्या लगडी लपवून ठेवल्या होत्या. पानगळीतल्या भयाण रात्री कुणीतरी एकटाच अंधारालाही ओळख न देता गढी खोदून सोन्याचा शोध घेतो. सुखाच्या शोधाचे असे कितीतरी खड्डे गढीभर पसरलेले आहेत. गढी आता पानं गाळून बसलेल्या झाडांसारखीच उजाड झालेली आहे.
पाटलाच्या गढीत वसंत कधी येणार, हा प्रश्न पाखरांनाही पडलेला. पाखरांच्या असंख्य पिढ्यांनी पाटलाच्या रंगमहालात उत्कट रसिकतेची मादक दरवळ बघीतली आहे. नशिबाची पानगळ आली आणि केवळ रसिकताच उरली. व्यक्त होण्यासाठी संपन्नता लागते. उपभोगाचे भोग मग पाटलाला छळू लागले. माघातल्या ओरबाडून टाकणार्र्या वार्र्यात शरीरही पिंजून निघालेले. मग रसिकता उपभोगाची दासी झाली. जीवनातले गुलजार वसंत छळतात अश्यावेळी! म्हातारा पाटिल वसंताच्या आठवणींनी बेभान व्हायचा. मग गावातल्या गरत्या घरच्या घरंदाज गृहिणींच्या पायातही चाळ बांधायला म्हातारा पाटिल धावू लागला. गावाच्या चीरेबंदीपणाला असे तडे जाऊ लागले. पाटलाच्या तालेवारपणाखाली वाकलेले गाव एक दिवस ताठ झाले. श्रीमंतीच्या आठवणीत खंगलेल्या पिढीनंही म्हातार्र्याविरुद्ध बंड केले. म्हातारा पाटिल आता गढीवरच्या वाड्यातल्या वरच्या खोलीत बंदिस्त. पानगळीने हैराण झालेल्या भणभणत्या माध्यान्हीला वेड्या पाटलाच्या डोळ्यांत वसंत नाचू लागतो. भोगलेल्या स्त्रीयांच्या नावाने पाटलाची कावकाव सुरु होते. वसंतसेनेच्या अनावृत्त अवयवांच्या रसभरीत वर्णनांनी पाटलांची बेताल बडबडही तालबद्ध होते.
शिशिराची पानगळ झेलत वसंत तेव्हा गावतळ्याकाठी निवांत बसलेला असतो. शिशिराचा प्रवेश संपला, की त्यालाच रंगमंचावर यायचे असते. असे प्रवेश ऋतूंना चुकूनही चुकवता येत नाहीत.

No comments: