Monday, May 28, 2007

ऋतुस्पर्श - डॉ.सुलभा हेर्लेकर यांचे समिक्षण.

ऋतुस्पर्श हे श्याम पेठकरांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं ललितबंधांचं पुस्तक! मुखपृष्ठ अतिशय देखणं! आकारही थोडा अनोखाच. दोन हातंच्या प्रतिकांतून माणूस, भाषा, आणि स्पर्शातीत ऋतुंचे झंकार एकवटले आहेत. तसे श्याम पेठकर हे पत्रकार, कथाकार, नाट्यनिर्मिती करणारे... पण या सर्वांपेक्षा त्यांचे हे ललितबंधांचे स्वरूप अधीकच भावले. हे सारे ललितबंध अग्रलेख म्हणून प्रसिद्ध झालेत. वृत्तपत्रात एवढे लालित्य असणारे तेही ग्रंथलेखांच्या रुपातून - हे वेगळेपण सततच जाणवत राहते. केव्हातरी आठवतंय, 'ऊन्हाळा' या विषयावर कै. भाऊसाहेब मालखोडकरांनी अग्रलेख लिहला होता.. इथे तर सारेच ऋतू... चैतन्याचे खांब घेऊन उभे राहणारे!
राजन खान यांनी 'श्याम पेठकर हा निखालस जिवंत मनाचा माणूस आहे' असं म्हटलंय ते अचूक आहे. माणूस आणि निसर्ग ईथे एकरूप झालाय. एकूण ४८ लेखांचा हा संग्रह! कोणतेही पान उघडावे आणि कुठलाही लेख वाचावा... मन पिसासारखं हलकं होऊन जातं. इथे मुळी ललितबंधांची व्याख्याच कोलमडून पडते. ईथे आहे ते संवेदनशिल मनाने टिपलेले ऋतूंचे लाघव, लडिवाळपणा, देखणेपणा, हिरवेपणा, आणि अतिव उदासलेपणाही. या प्रत्येक लेखाला एक प्रकृती आहे. आपलेपणा आहे. गोडवा आहे. निसर्गाचा गारवा आहे. एखादा लेख जरी वाचून काढला तरी थकवा दूर होतो. निवांत वाटतं. स्वप्नांत तरंगल्यासारखं वाटतं. यातला पहिलाच लेख 'स्वप्नऋतू' - याची साक्ष देतो. लेखक सांगतो, "वसंतात मोहरल्या आंब्याखाली बसून सावलीची शाल पांघरून डोळे मिटून घेतले की, मनात सावळ्याच्या बासरीचे स्वर फिरायला लागतात. अश्या क्षणांना अगदी ठरवूनही नाकारता येत नाही. नकार आणि होकार दोनही आपल्या हातचे नसणारे असे क्षण नियती आपल्या ओच्यात टाकते. ती ऋतूभूल असते. असे क्षण आपण भोगतो, की ते क्षणच आपला उपभोग घेतात?... की आपण आणि असे गुलबास क्षण या दोहोंचीही संधी घडवून आणखी कुणी आपल्या आत मोहरत असतं? तसे संध्याकाळ म्हणजे नवनिर्मितीचे क्षण!" हा लेख असाच लालित्यपूर्ण अंगाने आपल्याला कवेत घेत पुढे जातो. आपल्या जीवनातल्या अनेक स्मृती फूलवत जातो. आणि असा जातो की असे काही होतेय याची त्याला जाणच नसते. पाखरांना स्वतः उडण्याची जाण असते का?... तसेच पाखरांच्या सहजपणे उडण्यासारखेच हे पेठकरांचे सारे लेख सारं शरीर, मन व्यापून टाकतात. स्वतःचे दूसरे टोक गाठतांना 'ग्रीष्माचे अवतरण' वाचले नि सूचकपणे आलेली अर्थाची वलये, सामाजिकता आणि तरी भाषेमध्ये लपलेली ... सौंदर्याची जात. "आमचे घर गळते तेव्हा आमचीच चूल जळत असते. आमच्या प्रारब्धाचे हे प्राक्तन तूलाच काय; पण असेल अस्तित्त्वात तर त्या परमेश्वरालाही पुसता येणार नाही! तेव्हा ग्रीष्माचा अर्थ आणि पडणार्र्या पावसाचा भिजूपणा कळून येतो."
माणसातला माणूस कसा निसर्गमय होतो आणि निसर्गात विरघळतांना त्याचे माणूसपण कसे विरघळते - याचं वर्णन पेठकर अत्यंत नेमक्या आणि अचूक भाषेत करतात. 'मौनचाफा' यात "मौनधुंद सुगंधाला शब्धाचे धूमारे फुटू लागले तर फुलांना शब्दकळा येतील. माणूस हळवा झाला की, उंबरे अडवतात त्याला अन प्रसंग हळवे होतात. अशा वेळी फुलं नेमकी बोलू लागतात. असे कितीतरी शब्दांच्या सहज फुलव्यातून पेठकर आईचं मनही उलगडतात. "ओंजळभर फुलं आईच्या ओंजळीत टाकतांना त्याचे हात चाफ्याचे होतात. किंवा समाधिस्त आईचे डोळे चाफ्याचे होतात. तो कृष्ण कृष्ण होतो. डोळे मिटतात अन मनात मौनाचा अंतर्नाद घुमतो. "मौनचाफा" हा लेख असा वेड लावून जातो. कितीदा वाचला तरी मन भरत नाही. पावसाचे तर किती अंगांनी लेखक वर्णन करतो - पहिला पाऊस, भिजपाऊस, पाऊसवेणा, भेत पावसाची, किती तर्र्हांनी पावसाचे उत्कट चित्रं लेखक रंगवतो. कुठल्या रंगात भिजायचं ते फक्त आपण ठरवायचं. निसर्गाच्या अनेक संदर्भातून आणि भाषेच्या संभ्रमातून देखणी ऋतूस्पर्श चित्रे उमटवतांना भाषा जिवंत असणे किती महत्त्वाचे असते. जणू निसर्ग आपणच आहोत - निसर्गाचे जगणे आपलेच आहे या उत्कट पारदर्शी भाषेचे लेणे पेठकरांना लाभले आहे. या सार्र्याच अनुभवात स्वप्नांची हलकीशी किनार आहे. या निसर्गानुभवांनी लेखकाला समृद्ध केले आहे. त्यांच्या अभिजात शब्दकळेने, उत्कट भाषाभिव्यक्तीने समुर्त करून त्या जादूभर्र्या निसर्गात आपल्याला ते घेऊन जातात. ऋतूचा एक सुंदर प्रवास ते काव्याच्या उत्कट भाषेतून घडवतात. तसे तर ललितलेख नव्हतेच. ललितबंधही नाहीत. तर हे ललितगंधच आहेत. 'मी' चा घेतलेला ऋतूस्पर्शी बोध आहे. या निसर्गाच्या 'मी' चे जगणे लयधुंद तर आहेच शिवाय त्याच्या शब्दात एक अनुभवाचे लेखही आहे. एखाद्या ऋतूतून एखादंच झाड, एखादा ऋतूमग्न पक्षी, एखादा अनावट राग, एखादं पावसाचं वलय व्हावं ईतकं झपाटून टाकलं की त्याचा आणि त्यांच्या अंतर्मनाचा संवाद होत सुरेल लयीत त्यांचे ललितबंध आकार घेतांना जीवनाला सामोरे जातांना हसर्र्या ताज्या फुलांच्या ताटव्यासारखे त्यांचे मन सारे निसर्गकण टिपून घेते. ऊब, संधीकाळ, चंद्रसुगीचे दिवस, तिचे दिवस, हे बंध तर किती तरल उमटले आहेत.
ललितलेखनाचा स्व-अनुभव हाच मुळी पाया आहे. सच्च्या अनुभवाचे हे चित्रण असते. या चित्रणातून त्याचा स्वभाव, त्याची शैली, त्याचे संस्कार, त्याच्या लेखनातून व्यक्त होते. ना.सि.फडकेंपासून तो रविंद्र पिंगे, वि.स.खांडेकर, शिरिष कणेकर आणि अलीकडचे श्रीनिवास कुलकर्णी, वासंती मुजुमदार, दुर्गाबाई भागवत, इत्यादी लेखकांच्या जाणिवा त्यांच्या ललितलेखनातून, सामाजीक अनुभवातून व्यक्त होताना दिसतात. दुर्गाबाईंचे ऋतूपर्वमधले ललितलेखन ऋतूंवरचेच. त्यांच्या ललितलेखनातून सतत दिसत राहतो तो जीवनाला सर्व बाजूंनी कवेत घेउ पाहणारा, त्याचा तळ शोधू पाहणारा एक मनस्वी कलावंत! आपल्या जाणिवा, आणि नेणीवा याला एकाच वेळी स्पर्श करून जाणारी वृत्तीची डूब कलावंतांच्या निर्मितीप्रक्रीयेत फार महत्त्वाची असते. जो काही आपला आशय असेल, त्याची खोलात खोल जाऊन अनुभूती घ्यावी आणि मग त्या अनुभूतीची स्वतःच्या मनात घडली असेल ती जाणीव ताद्रुष्याने प्रकट करावी! नेमके श्याम पेठकरांच्या संदर्भात हेच घडलेय. उलट दुर्गाबाईंच्या वर्णनापेक्षाही पेठकरांचे ललितबंध मनाचे तळ ढवळून काढतात.
पेठकरांचे ऋतूस्पर्श वाचतांना लक्षावधी सौंदर्यरुपकांच्या दर्शनाने आपण मोहित होतो. 'ऋतूस्पर्श' चे आणखी वैशिष्ट्य असे की ते तथाकथीत चिंतनाने वगैरे जगवले नाही तर निसर्गातले खास असे सांगतांना क्रूर, करूण विनाशी, असेही दाखवतात. 'कोवळी ऊन्हे', 'ऋतूंचा चेहरा बदलतांना','पानगळ' अशा ललितबंधांतून या अनुभवांचा प्रत्यय येतो.
पेठकरांना जीवनाचे आकर्षण आहे. निसर्ग आणि त्यातली सजीव निर्जीव सृष्टी यांच्याकडे ते कुतूहलाने बघतात. स्पर्श करतात. भरभरून अनुभवलेल्या आणि सुक्ष्मपणे हाताळलेल्या निसर्गाच्या विविध रुपांचे हे प्रवाहे दर्शन आहे. पावसावरचे आणि श्रावणाचे लेख बघीतले की हे पटते. लेखकाचा हा विमुक्त प्रवास आहे. अनुभवांचे भार जड झाले, की असे ऋतूस्पर्श मनात झुलू लागतात. ललित लेखनाचा केवळ भावनेशीच नव्हे, तर देहाशी ब आगच्या मागच्या जीवनाशीही घनिष्ट संबंध असतो. हा अनुभव जेवढा बळ देणारा तेवढा अविष्कार समर्थ होतो. पेठकरंच्या तरल अनुभवांशी वाचक तसाच सामर्थ्यानिशी भिडतो. स्पर्शितो. आणि तनामनाला समाधान दिल्याबद्द्ल लेखकाच्या प्रेमात पडतो. आणि फुलाने फुलाला टिपावे तसे त्यांच्या ललितबंधांशी एकरूप होतो.

- डॉ.सुलभा हेर्लेकर
१२२. अभ्यंकर रोड
धंतोली, नागपूर.

No comments: