Sunday, May 6, 2007

"ग्रीष्मपर्व"

पांथस्थांनी गर्द सावलीतला गारवा शोधावा, असेच सध्याचे दिवस आहेत. उन्हं तापू लागली आहेत. सावल्याही आता करपू लागल्या आहेत. सुस्तावलेल्या गर्भारशिणीसारखे दिवस जडावलेले आहेत. पळसाचे निखारे देखील विझले आहेत. चटोर हिरवी पाने उगाच ऊन्हाला वाकुल्या दाखवतात आणि उन्ह आणखीनच चिडचीडी होतात.
फुलांनी सारी उमेद सोडावी, असं वातावरण तापलंय्. आताशा पहाट होते, पण सकाळ होतच नाही. एकदम दुपार होते. वैशाखातल्या दिवसाचे एकच रखरखीत वास्तव असते... टळटळीत दूपार!

प्रत्येकच ऋतूचा आपला एक चेहरा असतो. वैशाखाचा चेहरा म्हणजे दुपार. तसे कूठलेच ऋतू आपले नसतात. ऋतूंचे सगळे संदर्भ आपल्या गरजांशी बांधले असतात. गरज भागली की ऋतूही नकोसे होतात. कुठल्याही ऋतूचा असा नकोसा होत जाणारा उत्तरार्ध जीवघेणा असतो. ऋतूंचे असे जळत जाणे म्हणजे वैशाख. अशातही उमलणार्र्या फूलांचे दहन केले तर राख होईल का? असे प्रश्न ऋतूंना पडू नयेत. तसे ते पडतही नाहीत. फूलं जाळण्याची क्रुर कल्पना एखाद्या ऋतूला सुचू नये. फुलांचे कोमेजणेच कातर करते. फुल जळायला लागली तर...? ऋतूच्या अश्या अतिरेकाची तक्रारी फुलांनी कुणाकडे करायची? प्रत्येक बहरानंतर असे जळणे हेच फुलांचे प्राक्तन असते का? ऋतंचे बेगुमान हल्ले परतवून लावण्याचे सामर्थ्य फुलांच्या कुठल्याच पिढीने कमावलेले नाही. मग फुलं बिचारी सावली शोधतात. झाडं पाणी देणारे हात शोधतात. वैशाख वणवा मात्र दुष्टासारखा नेमका नकटेपणा करतो. जाळणारी उन्ह अशा पाणीभरल्या ओंजळी शोधून काढतो. आधी ओंजळीतं पाणी शोषून घेतो नि मग ओंजळीच्या हातांची उमेद संपवितो. सावलीभरल्या जंगलात वृक्षाच्या सावलीत वाहणार्र्या निशःब्द झर्र्याच्या तोंडचे पाणीही हा वणवा पळवीतो. गाणार्र्या कोकीळेच्या पायातील पैंजणं तोडतो. इतकेच नव्हे, तर सांजवेळी हंबरणार्र्या निळ्या डोळ्यांच्या गाईंच्या हंबरण्यातला ओलावाही सुकवितो. हा वणवा डोळ्यांतील स्वप्नंच नव्हे, तर स्वप्नांसह डोळे पळवितो. म्हणून ऋतू असे बेइमान व्हायच्या आधीच वडाच्या झाडाखालच्या पडक्या मंदिरात झर्र्याचे पाणी, कोकीळेची पैंजणं, गाईंचे हंबरणे आणि स्वप्नभरले डोळे जपून ठेवावेत. पाणी देणार्र्या ओंजळींचे सपिंडी दान करावे. असे केल्याने एक होते. ऋतू कितीही बेईमान झाला, तरी गाभार्र्यातील ओलावा मात्र कायम राहतो. ऋतूंची पाठ फीरली की, रात्रीच्या कोरड्या अंधारात कोकीळेला तीची पैंजणं मंदिराच्या गाभार्र्यात सहज सापडतात. पहाटेला मग गाणे शोधत भटकावे लागत नाही. अन खास म्हणजे ऋतूबदल होतांना त्रास होत नाही.

उन्हं मंदिराच्या गार गार गाभार्र्यात शिरतच नाहीत, असे नाही. देव जागविणारी भलीमोठी घंटाही उष्ण होते. चिरेबंदी दगडाच्या जोडाईतून आत शिरलेली वडा-पिंपळाची मुळं कोरडी पडतात. पण जीर्ण मंदिराच्या दगडांवरची त्यांची श्रद्धा मात्र अभेद्य असते. कदाचित या श्रद्धेचेच पाणी होत असावे. वैशाखातली एकट दुपार गारवा शोधत मंदिरात विसावलेली असते. ही दुपार एकटी असते. तहानलेली असते. वैशाखातल्या मध्यान्हीचे एक बरे असते. तीला ओलाव्याची आस असली तरी आशा मात्र नसते. अशी कोरडीठण्ण दुपार खूप प्रामाणीक वाटते. अपेक्षांचे ओझे ती वहात नाही. चैत्र मिलनानंतर अस्तीत्त्व विलग होतांना ती उसासत असते की, आषाढातल्या गच्च ओलेत्या प्रणयाच्या कल्पनेनं तिचा ऊर धपापत असतो. कानशिलं तापलेली असतात आणि लज्जेनं ती लाल झाली असते... ऋतूंशी एकरूप झालेल्यांना देखील हे कळत नाही.

वैशाखातली दुपार अशी अनाकलनिय असते. चिरेबंदी वाड्याती बंदिस्त प्रणयिनीसारखा तिच्याही डोळ्यांत प्राजक्त फुलला असतो. अन त्यालाही तीच्या सात्त्वीकतेची जोड असते. पिडेने तळमळणार्र्या अशा दुपारीच, मोगर्र्याच्या सुगंधाचा प्रकाश कसा असेल किंवा समईतल्या ज्योतीला सुगंध असतो का, असे प्रश्न पडतात. प्रकाशाचा सुगंध आणि सुगंधाचे तेज नेमके अश्या वेळी एकांतात गाठतात. असा एकांत फार कठीण असतो. देहातून आत्मा सोलून काढणारा असतो. अश्या वेळी ती गुलनार तळ्याकाठच्या तप्त संगमरवरी चबुतर्र्यावर बसून तळ्यातल्या निळ्या कमलफूलाकडे बघत असते. तिच्या डोळ्यांत वैशाख सर्व अंगांनी प्रकटला असतो. तेवढ्यात तो तीथे येतो. ती युवराज्ञी. तो एक पंचहजारी मनसबदार... पण डोळ्यांत अंगार कधी, कुणासाठी पेटणार, हे कुणालाच ठरवता येत नाही. अंगार ठरवून पेटवता येत नसतो. पेटला, की तो थोपवताही येत नाही... तळ्याच्या पाण्यात तिच्या प्रतिबंबाच्या नेमके मागे त्याचे प्रतिबिंब... सूर्य पाण्यातही अंगार फूलवित असलेला. ती सहेतूक त्याच्याकडे बघते. भाल्याच्या टोकाने कमळाचे फूल खुडून ते झर्रकन तीच्या पायाशी ठेवून तो निशःब्द निघून जातो. अशावेळी उन्ह बोलकी होतात. नेमके तेच सांगून जातात. पण ऋतूंचे असे कोवळेपण करपल्या जीवांना पचत नाही. अंधाराचे खबरे उन्हातल्या अशा आयुष्य उजळून टाकणार्र्या गोष्टी जाउन सांगतात. मग त्याला मरणाच्या लढाईला पाठवले जाते... तिला त्याच्या मृत्यूची बातमी कळते, तेव्हा ती डोळ्यांत गुलाबपाणी टाकल्याचा बहाणा करून रडून घेते. असे अनावर बहाणे डोळ्यातून सांडले की, वैशाखाचा वणवा होतो.
तगड्या सरदाराच्या अश्या मृत्युची ही गोष्ट आठवली की, मालकाच्या आठवणींनी शुभ्र अश्व सैरभैर होतात. चौखूर उधळतात. धुळीचे सुक्ष्म निखारे वारा उडवून नेतो. पाचोळा गरगरत राहतो. वणव्याची वावटळ होते. गावशिवेजवळच्या त्याच्या समाधीवरून निघालेली ही वावटळ गावकूस ओलांडते. वावटळीने गावाचा उंबरठा ओलांडणे तसेही अशुभच असते. अश्या वेळी सूर्यकिरणांना धार येते आणि पाचोळ्यांचे अस्त्र होतात. अशा वेळी गाव आपले नसले तरी गावचे स्मशान आपले असते. भगभगीत उन्हात विहरीच्या पाण्याने अंग धुवून स्मशानजोगी जागराला सिद्ध होतो. धनावरची नागिण बिळ सोडून स्मशानातल्या मंदिराच्या गाभार्र्याकडे धावते... हे असे एखाद्या लहानश्या गावातच घडते असे नाही, महानगरातही घडते. हळवे काळीज जीथे असेल, तीथे असेच घडण्याची शक्यता असते. अशी काळीजवेळ झाली की, ओल्या डोळ्यांच्या हळव्या माणसांनी मेंदिभरले हात घट्ट धरावे. कारण वैशाखातली संध्याकाळ सूर्याचे तेज कुशीत वाढवणारी असते. ती हळूवार असते, पण कोरडी असते. संध्याकाळचे असे कातर कोरडेपण अंधाराला फावणारे असते. काळीजवाल्यांना मात्र ही संध्याकाळ हळूच अंधाराच्या दरीत नेते. या अंधारदरीतून ओरखडाही न पडता बाहेर पडायचे असेल तर मोगर्र्याची फूलं गजर्र्यात माळून ती काठावर उभी असते. पडक्या वाड्याच्या देवडीपाशी आई समईसारखी तेवर असते. देव्हार्र्यात धूप दरवळत असतो. वैशाखातल्या सांजभूलीला फसायचे नसेल तर ओंजळभर मोगर्र्याची फूलं, समईसाठी तेल अन धूप राखून ठेवला पाहिजे. असे एकदा झाले, की वैशाखातली संध्याकाळ स्नेहमय होते. जेष्ठातला पाऊस मग सहजगत्या येतो. पण त्यापूर्वी जमिनिला तडे गेले पाहिजेत. त्याशीवाय पावसाला चिखल करायला मजा येत नाही. वैशाख म्हणूनच पेटत रहायला हवा.

No comments: